Ganesh Sugar Factory
Ganesh Sugar Factory  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory : ...तर भागीदारी तत्वावर विखे पाटलांना कारखाना चालवायला कसा दिला ?

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, एकीकडे गणेश साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असतानाच तो पाच वर्षे करारानं चालवायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, अशातच साखर आयुक्तालयातील बैठकीत हा कारखाना अचानकपणे विखे पाटलांच्या कारखान्याला भागीदारी तत्त्वावर पाच वर्षासाठी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 30) रोजी घेण्यात आला. आता या निर्णयावरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

कारण निवडणूक प्रकिया सुरु असतानाच कारखाना भागीदारी तत्वावर पाच वर्षांसाठी चालवायला कसा दिला जाऊ शकतो असा संतप्त सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटलां(Radhakrishna Vikhe Patil)वर टीकेची तोफ डागली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी गणेश सहकारी साखर कारखाना आसवणी प्रकल्पासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पाच वर्षांसाठी भागीदारी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भातील निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याला पाच वर्षे करारानं चालवायला देणं हा शेतकरी, सभासद आणि कामगारांशी विश्वासघात आहे. हा सत्तेचा गैरवापर असून गणेश परिसरातील सभासद व शेतकरी सहन करणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला आहे.

ते पाच वर्षात काय जमणार?

गणेश सहकारी साखर कारखाना पाच वर्षांसाठी भागीदारी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भातील घटनाक्रम अत्यंत संशयास्पद आहे. ३० मे रोजी साखर आयुक्तांकडून बैठकीची सूचना आणि लगेच त्याचदिवशी बैठक आणि तातडीने गणेश कारखाना भाडेकरारानं देण्याचा निर्णय घेणं हे नेमकं कोणाच्या दबावातून हे सर्व केले जात आहे, याची जाणीव जनतेला आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे असा घणाघात थोरातांनी केला आहे.

तसेच यापूर्वी दहा वर्ष गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील यांच्या ताब्यात होता. त्याच काळात गणेश कारखाना संकटात सापडला. त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार? मुळात हा करार कारखाना चालवण्यासाठी नाही तर कायमचा बंद करण्यासाठी केलेला असल्याची घणाघाती टीका बाळासाहेब थोरातां(Balasaheb Thorat)नी केला आहे.

...म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार!

थोरात म्हणाले, ‘निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना गणेश सहकारी साखर कारखान्याचे खरे मालक असलेल्या सभासद आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन हा भाडेकरार होतो आहे. हा करार बेकायदेशीर आहे. न्यायालय आणि सभासद शेतकऱ्यांच्या दरबारातही तो टिकणार नाही. हा सत्तेचा हा गैरवापर असून सभासद आणि शेतकरी सहन करणार नाही.

गणेश सहकारी साखर कारखान्या(Ganesh Sugar Factory) च्या हितासाठी, सभासद व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी मी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलं आहे. कारखान्याच्या परिसरात विकासाची ही कामधेनु जिवंत राहण्यासाठी ही लढाई आम्ही लढत आहोत. त्यांचा हेतू जरी गणेश बंद करणे असा असला तरी, गणेशचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि ही संस्था चालवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असल्याची भूमिका थोरात यांनी स्पष्ट केली आहे.

'गणेश'वरुन राजकारण तापलं...

गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. आजी-माजी महसूलमंत्र्यांसह राष्ट्रवादी व भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या भूमिकेमुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र, गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच आमने-सामने येत आहेत.

शिवाय राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी कोल्हे यांचे नातू तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहेत. यामुळे ‘गणेश’चं राजकारण चांगलंच तापलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT