Raksha Khadse-Girish Mahajan-Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raver Loksabha : रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याचे धाडस भाजप दाखवेल का?

Sampat Devgire

Jalgaon News : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी ‘४५ प्लस'ची घोषणा केलेल्या भाजपला 'इंडिया' आघाडीकडून मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत खडसे फॅक्टरभोवती फिरणाऱ्या रावेर मतदारसंघात भाजप रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारण्याचे धाडस करेल का? सध्या यावर भाजपमध्ये 'खल' सुरू आहे. (Will BJP show the courage to reject Raksha Khadse's candidature?)

रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. रक्षा खडसे यांना तत्कालीन भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यामुळे उमेदवारी मिळाली होती, हे स्पष्ट आहे. सध्या मात्र राजकीय परिस्थिती बदलली असून एकनाथ खडसे भाजपचे प्रबळ विरोधक बनले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षामध्ये आहेत. राष्ट्रवादीतर्फे अर्थातच 'इंडिया' आघाडीचे उमेदवार म्हणून एकनाथ खडसे यांना प्रोजेक्ट केले जात आहे. एकनाथ खडसे यांनीही मनोमन लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याचे निश्चित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ खडसे आणि भाजपचे जळगाव जिल्ह्यातील नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळेच महाजन हे खडसे यांच्या वाटेत संधी मिळेल तेव्हा काटे पेरण्याचे काम करतात. या पार्श्वभूमीवरच मंत्री महाजन यांनी खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी न देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघ सातत्याने खडसे 'फॅक्टर'भोवती फिरत असल्याने आगामी निवडणुकीत उमेदवार कोण? हा प्रश्न भाजपपुढे निर्माण झाला आहे.

भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे ह्या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यांची उमेदवारी रद्द केल्यास भाजपला पर्यायी उमेदवार शोधावा लागेल. या उमेदवाराला अर्थातच थेट एकनाथ खडसे यांच्याशी लढा द्यावा लागेल. असा प्रबळ उमेदवार शोधणे भाजपला सध्या अडचणीचे आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी द्यावी की नाही? पर्यायी उमेदवार कोण असावा? एकनाथ खडसे भाजपला किती डॅमेज करू शकतात? या विषयावर खल सुरू आहे. त्यावर नेमका पर्याय आणि उत्तर दोन्हीही अवघड बनले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

खासदार रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यास एकनाथ खडसे स्वतः उमेदवारी करतील. त्यात रावेर मतदारसंघात कडवी झुंज असेल. याउलट रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यास खडसे रावेरची जागा काँग्रेसला द्यावी, असा प्रयत्न करतील. या निवडणुकीत ते तटस्थ राहून अप्रत्यक्षरीत्या कुटुंबातील एका खडसेला ‘सेफ पॅसेज’ देतील. त्यात भाजपचा फायदा होईल, असाही एक राजकीय सूर आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT