Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati Sambhajiraje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sambhajiraje News; संभाजीराजे नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी करणार?

Sampat Devgire

नाशिक : स्वराज्य संघटनेच्या (Swarajya) माध्यमातून राजकीय पटलावर स्वार झालेल्या संभाजी राजे छपत्रतींनी (Sambhajiraje) वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये (Nashik) आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. (Chhatrapati Sambhajiraje horn clarion of loksabha election)

छत्रपतींचा वारसा आणि मराठा क्रांती मोर्चात त्यांनी निभावलेली संयमी नेतृत्वाची भूमिका त्यांना साद घालते की, राजकारणापासून अलिप्त रहायला भाग पाडते, याचा फैसला २०२४ च्या निवडणुकीत होईल. तत्पुर्वी, संभाजीराजे छपत्रतींनी नाशिक लोकसभा निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावण्याचा निर्णय घेतलेला दिसतो.

शनिवारी नाशिकमध्ये आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करुन प्रचाराचा जणू नारळच फोडला आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवारी नाशिकमध्ये पार पडली. शुक्रवारी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देखील नाशिक दौर्यावर होते.

महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनीही नाशिकमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. संघटनेच्या स्थापनेनंतर त्यांचा नाशिकमधील हा पहिलाच मोठा सोहळा म्हणावा लागेल.

संभाजीराजे यापूर्वी अनेकदा नाशिकला आले. मात्र, सामाजिक व वैयक्तिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची ओळख होती; परंतु, आता थेट लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यामुळे अभिष्टचिंतन सोहळ्यातून त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, देवळाली व सिन्नर मतदारसंघाचे मतदान असल्यामुळे शहरी व ग्रामीण असा हा मतदारसंघ आहे.

शिवसेना व भाजप युतीच्या रुपाने हेमंत गोडसे हे दोन वेळा निवडून आले. त्यांनाही ‘हॅटट्रीक’ साधायची असेल. ते सध्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना भाजपच्या पाठिंब्यांची अपेक्षा लागून आहे. शिवसेनेची ताकद विभागली गेल्याने याच पक्षाचे दोन उमेदवार उभे राहिल्यास त्यांच्यात मतांचे विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राष्ट्रवादी स्वतंत्र उमेदवार या मतदारसंघात देऊ शकते. भुजबळ कुटुंबियांनी यापूर्वी या मतदारसंघात आपले नशिब अजमावले आहे. पण, समीर भुजबळ वगळता त्यांना फारसे यश प्राप्त झालेले दिसत नाही.

संभाजीराजे यांनी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार चालवलेला दिसतो. अभिष्टचिंतनानिमित्त त्यांनी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील व्यक्तिंची मतेही जाणून घेतली. सद्यस्थितीला त्यांना वातावरण पोषक वाटत असले तरी मैदान अजून दूर असल्यामुळे या आखाड्यात अजून किती पैलवान उतरतात आणि कुणामध्ये खरी लढत रंगते यावर पुढील चित्र अवलंबून राहील. अभिष्टचिंतनाच्या दिवशीच सहकुटुंब त्यांनी त्र्यंबकराजेचे दर्शन घेतले. त्र्यंबकराजा त्यांना काय आशीर्वाद देतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संघटनात्मक बांधणी मजबूत

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संभाजीराजेंनी लोकांसमोर स्वतंत्र विचार मांडला आहे. पारंपारिक राजकीय पक्षांना पर्याय म्हणून स्वराज्य संघटना आता मैदानात उतरली आहे. त्यांना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात, पाड्यांवर शाखा व कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल. संघटनेचे विचार मनामनात रुजवण्यासाठी यश प्राप्त झाले तर स्वराज्याचा भविष्यकाल उज्वल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT