अमोल खरे
मनमाड : (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी नगराध्यक्ष योगेश पाटील (Yogesh Patil) यांनी आज राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला. हा राष्ट्रवादीला धक्का मानला जातो. विशेष म्हणजे पाटील हे छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) जवळचे मानले जात होते. त्यांनी पक्षाला अर्थात भुजबळांना सोडले. ते भुजबळांचे कट्टर विरोधक आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याशी राजकीय सख्य करतील काय? याची उत्सुकता आहे. (Chhagan Bhujbal`s follower Yogesh Patil Resigne NCP)
श्री. पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे ते शिंदे गटात गेल्यास भुजबळांच्या नांदगाव मतदारसंघातील राजकारणाला धक्का बसेल. पाटील यांच्या राजीनाम्याचा फायदा कोणाला होणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
माजी उपमुख्यमंत्री भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे मनमाड शहरातील 'पाटील' कुटुंबातील एक महत्त्वाचे वजनदार व्यक्तिमत्त्व असलेले योगेश उर्फ बबलू पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यापासून पाटील नाराज असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला आज त्यांच्या राजीनाम्यामुळे पूर्णविराम मिळाला.
पंकज भुजबळ यांच्या पहिल्या आमदारकीपासून पाटील हे भुजबळांच्या जवळ होते. भुजबळांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. तर भुजबळांनी पाटील यांना शहराचे नगराध्यक्षपद देऊन त्यांना उभारी देण्याचे काम केले. भुजबळांच्या आमदारकीच्या काळात अनेक विकास कामे पाटील यांना करता आली. मात्र पंकज भुजबळ तिसऱ्यांना आमदारकीला उभे राहणार असतांना देखील पाटील सोबत होते. मात्र भुजबळांचा पराभव झाल्यानंतर एकाकी पडलेल्या राष्ट्रवादी पक्षाला सावरण्याच्या काळात पाटलांनी पक्ष लावून धरला होता.
पाटील परिवार हा मनमाडच्या राजकारणात वजनदार मानले जातात. मात्र राजेंद्र पगारे यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुमारे अडीच वर्षे पद रिक्त होते. या काळात योगेश पाटील यांना शहराध्यक्ष पद मिळेल अशीच सर्वांना वाटत असतानाच भुजबळांनी मात्र पाटील यांच्याकडे केलेला कानाडोळा आणि त्यानंतर शहराध्यक्षपदाची माळ दीपक गोगड यांच्या गळ्यात पडल्यानंतर पाटील हे पक्षापासून अलिप्त होते. पक्षात सक्रिय नव्हते. पाटील पक्ष सोडतील अशी चर्चा होती. मात्र भुजबळांच्या कानावर ही वार्ता गेल्यानंतरही त्याकडे का लक्ष दिले गेले नाही अशीही एक चर्चा होती. तसे पाहता पाटील यांना शहराध्यक्ष पद द्यायला काहीच हरकत नव्हते. त्यामुळे भुजबळांकडून पाटलांची उपेक्षाच केली अशीच चर्चा आहे. मनमाड शहरात भुजबळांच्या जवळचा 'मराठा' चेहरा असलेले पाटील पक्षापासून बाजूला झाल्यामुळे राष्ट्रवादीला धक्काच मानला जात असला तरी ही कमी भरून काढण्यासाठी आता भुजबळ कोणती खेळी खेळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
धात्रक, पगारे नंतर पाटील...
भुजबळांच्या विश्वासू सहकाऱ्यांत व शहराच्या राजकारणात गणेश धात्रक, राजेंद्र पगारे आणि योगेश पाटील हे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र भुजबळांशी असलेली जवळीक कालांतराने कमी होत गेली. गणेश धात्रकांचे राष्ट्रवादीत महत्व कमी झाले होते. पक्षांतर्गत धुसफूस सुरू होती. त्यामुळे त्यांनी थेट भुजबळांशी पंगा घेऊन शिवसेनेशी हातमिळवणी केली. त्यानंतर शहराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी पक्ष सोडला व वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिला. मनमाड शहरावर भुजबळांची एकहाती सत्ता ठेवणारे तीनही शिलेदार आता बाजूला गेले. त्या तोलामोलाची माणसे पक्षात येतांना दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.