Nashik Politics : येवला नगरापालिका निवडणूक मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थित झाली. भुजबळ आजारी असल्याने माजी खासदार समीर भुजबळ हे येवल्याच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे समीर भुजबळांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागणार होता. आजवर येवलेकरांनी ज्या प्रकारे मोठ्या भुजबळांना सांभाळलं तसेच धाकट्या भुजबळांना येवलेकर स्विकारतील का हेच या निवडणुकीत पाहणे महत्वाचे होते.
आता नगरपालिका निवडणूक जिंकल्याने समीर भुजबळांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. समीर भुजबळांसाठी ही निवडणूक म्हणजे एकप्रकारे विधानसभेची रंगीत तालीम होती. ज्यात समीर भुजबळ यांनी कुस्ती जिंकली आहे. भविष्यात छगन भुजबळ हे केंद्रात गेल्यानंतर येवल्यातून समीर भुजबळ यांना विधानसभा निवडणुक लढवायला काहीच प्रॉब्लेम नाही हे या निवडणुकीने सिद्द केले आहे.
येवलेकरांनी छगन भुजबळांना सलग पाचवेळा निवडून देत आमदार केलं. भुजबळ येवल्याचे जननायक बनले, विकासपुरुष म्हणून येवलेकरांनी त्यांना संबोधलं. भुजबळांवर येवलेकरांनी इतका विश्वास टाकला की जरांगे फॅक्टरही येवल्यात निष्प्रभ ठरला. त्या वातावरणातही भुजबळ चांगल्या मतांनी निवडून आले. आता भुजबळांच्या नंतर पुतणे समीर भुजबळांचे नेतृत्वही येवलेकरांनी मान्य केलं आहे. हेच नगरपालिका निवडणुकीत सिद्ध झालं.
भुजबळांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळांनी येवल्याचा गड राखला. मंत्री समीर भुजबळांनीच या निवडणुकीचे सगळे सूत्र हलवले. दराडे बंधूंना धूळ चारत समीर भुजबळांनी आपला नगराध्यपदाचा उमेदवार निवडून आणला. याशिवाय निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आणले. भाजपला सोबत घेण्यातही छगन भुजबळ यांची मदत घेऊन समीर भुजबळ यशस्वी ठरले.
माजी आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांनी आपल्या पुतण्याला रुपेश दराडे यांना उमेदवारी दिली होती. अशात दराडेंच्या विरोधात योग्य उमेदवार समीर भुजबळांना शोधावा लागणार होता. अनेक मातब्बर इच्छुक असतानाही राजेंद्र लोणारी यांच्या सारख्या मितभाषी व सर्वसाधारण पैलवान व्यक्तीला उमेदवारी देऊन समीर भुजबळ यांनी मोठी खेळी खेळली.
भुजबळ कुटुंबीय पुढची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच या निवडणुकीच्या प्रचारात उतरलं होतं. समीर भुजबळांसाठी ही निवडणूक म्हणजे विधानसभेची सेमी फायनलच होती. या निवडणुकीतील यशानंतर आता विधानसभेची फायनल मॅच खेळण्यासाठी समीर भुजबळांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.