लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना नाशिक जिल्ह्यात विधानसभेत छगन भुजबळांना हरवण्याची तयारी सुरू झाली आहे.
येवला विधानसभा मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना यावेळी कुणाल दराडे यांच्याकडून तगडे आव्हान उभे केले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच दराडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला आहे. दराडेंना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईतून थेट येवला (Yeola) गाठल्यानंतर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मागे वळून पाहिले नाही. न्यायालयीन कोठडीत असतानाही येवलेकरांनी भुजबळांना निवडून दिले होते. विकासकामांबाबत आपण आग्रही असल्याने येवलेकर आपल्यावर प्रेम व्यक्त करतात, असा दावा भुजबळ सातत्याने करीत असतात.
यापूर्वी भुजबळांना फारसा विरोध होत नव्हता. 'मराठा विरुद्ध माळी' असे चित्र निवडणूककाळापुरते मर्यादित असायचे. तसेच त्याचा परिणाम मतदानावर होत नव्हता. पण यंदा परिस्थिती बदलली असून, भुजबळांसमोर दराडे कुटुंबीयांचे मोठे आव्हान असणार आहे.
कुणाल दराडे (Kunal Darade) हे आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचे पुत्र आहेत. नरेंद्र दराडे हे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आहेत. कुणाल दराडे यांचे काका किशोर दराडे (Kishore Darade) हेदेखील विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करतात. राजकीय पार्श्वभूमी भक्कम असलेल्या कुणाल यांना महाआघाडीचेही समर्थन मिळण्याची दाट शक्यता आहे.
महाआघाडीचे स्थानिक नेते माणिकराव शिंदे आणि छगन भुजबळांचे वैर सर्वश्रृत आहे. माणिकराव शिंदे हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यातच पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांविरोधात येवल्यातूच रणशिंग फुंकले होते.
मराठा आरक्षणामुळे मराठा विरुद्ध भुजबळ असा संघर्ष येवल्यात तीव्र आहे. त्यातच कुणाल दराडे हे ओबीसीच असल्याने भुजबळांना तोटा, तर महाआघाडीला फायदा असे मतांचे गणित सध्या आखले जाते आहे.
दरम्यान, आमच्या कार्यक्षेत्रात नसताना आम्ही भावांनी येवल्याच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आणला. आम्ही भूमिपुत्र असून, येवल्याच्या विकासात राजकारण करीत नाही. कुणाल दराडे विधानसभेसाठी तयार आहेत. मात्र महाआघाडीचा काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाआघाडीचा उमेदवार कोणीही असला तरी भुजबळ पुन्हा आमदार होणार नाहीत, असा दावा आमदार किशोर दराडे यांनी केला आहे. आम्ही दोघे भाऊ विधान परिषदेतून विधानसभेवर येणार नाहीत, असेही किशोर दराडे यांनी स्पष्ट केले.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.