Mumbai News: पुण्यातील ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. त्यानंतर या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले.
यानंतर ललित पाटीलबरोबर राज्यातील काही दिग्गज नेत्यांचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. मात्र, आता या प्रकरणी माजी आमदार योगेश घोलप यांनी प्रतिक्रिया देत ललित पाटीलशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
"ललित पाटीलला ससून रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला फोन केला होता", असा आरोप करत भुसे यांचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत, त्यानंतर या प्रकरणाची माहिती समोर येईल, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. अंधारे यांनी केलेल्या आरोपानंतर दादा भुसेंनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. यातच आता ललित पाटीलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, मंत्री दादा भुसे यांच्यासह आदी नेते दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता माजी आमदार योगेश घोलप यांनी यावर प्रतिक्रिया देत ललित पाटीलशी माझा काहीही संबंध नसून पक्षात प्रवेश करताना कोणाचा बायोडाटा बघितला जातो का ? कोणाच्या कार्यक्रमाला कार्यकर्ता आला म्हणजे त्याच्या धंद्याशी नेत्याचा संबंध असतो का ?" असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
दरम्यान, "या प्रकरणामध्ये लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, हे प्रकरण गंभीर असल्याने याची सखोल चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, युवा पिढी बरबाद होता कामा नये", असे योगेश घोलप म्हणाले.
Edited by Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.