Chhatrapati Sambhaji Nagar : वंचित बहुजन आघाडीचा भाजपविरोधी 'इंडिया' आघाडीत समावेश होणार की नाही, याचा निर्णय अजून झालेला नाही. महाविकास आघाडीतील नेते 'वंचित'चा 'इंडिया' आघाडीत समावेश व्हावा म्हणून आग्रही आहेत. मात्र, अजूनही 'वंचित'च्या समावेशाबाबत निर्णय न झाल्याने वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यकारणीच्या बैठका आयोजित करत निवडणुकीची तयारी करत आहे. त्यात आता 'वंचित'कडून लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसमोर नवा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे. यासाठी जागांची समान विभागणी व्हावी, असा आमचा फाॅर्म्युला आहे. त्यामुळे वंचितसह चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यत असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी ठेवला आहे. या चार पक्षांत राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश आहे. अशी चर्चा 'वंचित'च्या राज्य कार्यकारिणीच्या मंगळवारी (२६ डिसेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ठाकूर यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे जागांचे समसमान वाटप व्हावे, असे देखील ठाकूर म्हणाल्या.
'वंचित'च्या मागणीमुळे महाविकास आघाडीमधील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी शिवसेना 20 ते 22 जागा लढणार असल्याचे आधीच सांगितले होते. तसेच जास्त जागांच्या मागणीसाठी काँग्रेस देखील आग्रही आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार, असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आहे.
काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त नागपूरमध्ये महारॅलीचे आयोजन केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते त्यामध्ये व्यग्र आहेत. या रॅलीनंतर वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, अशी माहिती आधीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली होती. मात्र, त्यापूर्वीच 'वंचित'ने 12 जागांची मागणी करत आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
Edited by Roshan More
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.