Mahapalika Nivadnuk : एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांनी नुकतीच युतीची घोषणा केली आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीची वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी झालेली युती तुटली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर आणि नेते शिरीष चव्हाण यांनी ही माहिती दिली.
जागा वाटप आणि चिन्हाच्या मुद्द्यावर या दोन्ही पक्षांचे एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याचवेळी बहुजन विकास आघाडी मनसेसोबत युती करण्यास तयार असल्याची माहिती आहे. पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसेची वसई विराईमध्ये पंचायत झाली आहे. इथे आता मनसे काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मशाल चिन्हावरच लढणार असल्याचे सांगत 25जागांचा आग्रह धरला. तर ठाकूर यांनी 8 जागा देऊ, असे सांगत चिन्ह समानच असले पाहिजे, अशी भूमिका मांडली. हा प्रस्ताव ठाकरेंच्या नेत्यांनी अमान्य केला आहे. 25 जागांची मागणी मान्य झाली नाही. निवडणुकीपूर्वी आघाडी झाली असती तर शिट्टी निशाणी घेतली असती. निवडणुका जाहीर झाल्याने ही आघाडी अशक्य असून शिट्टी चिन्ह घेतल्यास बविआचे एबी फॉर्म घ्यावे लागतील, असे स्पष्ट करण्यात आले.
शिट्टी चिन्हावर न लढता मशाल चिन्हावरच लढण्याची पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार असून सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याची पक्षाची तयारी आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर आणि शिवसेना नेते शिरीष चव्हाण यांनी दिली.
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत युती करण्यासाठी पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चर्चेची सुरुवात केली होती. त्यासाठी नेते विलास पोतनीस, अमोल कीर्तीकर यांनी ठाकूरांसोबत बैठकही घेतली होती. त्यानंतर स्वतः आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही विरारमध्ये येऊन ठाकूरांशी चर्चा केली होती. तेव्हा युती होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा होत असल्याची माहिती ठाकरे सेना नेत्यांनी दिली होती.
भाजपच्या विरोधात महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सोबत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेत गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक बैठका होऊन आघाडी करण्यावर एकमत होत असतानाच बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चिन्ह आणि सन्मानजनक जागा मिळत नसल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि मनसेची अद्यापही बविआसोबतच लढण्यासंबंधी बोलणी सुरु आहे.
काँग्रेसने 29 जागा मागितल्या असल्या तरी त्यात वाटाघाटी सुरु आहेत. तसेच समान चिन्ह घेण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. यासंबंधी वरिष्ठांची बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.