माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती निवडणुकीची घोषणा.
भाजप संसदीय बोर्डाने एनडीए उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव निश्चित केले.
निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे.
Pune News : आपल्या पदाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक राजीनामा दिला होता. त्यांनी यामागे आरोग्यविषयक कारणे सांगितली होती. पण केंद्र सरकारसोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता या गोष्टीला जवळपास महिना होणार आहे. तर नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पुढील महिन्यात 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट असून पडताळणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान भाजप संसदीय बोर्डाने एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव निश्चित केले आहे. याबाबत आज रविवारी (ता. 17) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घोषणा केली. ही घोषणा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्यापक चर्चा केल्यानंतर केली.
यानंतर आता एनडीएच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत राधाकृष्णन देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडूचे रहिवासी असलेले सीपी राधाकृष्णन यांची गणना आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते. राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुप्पूर येथे 20 ऑक्टोबर 1957 रोजी झाला. ते वयाच्या 16 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि जनसंघात सामील झाले. दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी कोयंबटूर येथील व्ही.ओ. चिदंबरम कॉलेजमधून बीबीएची पदवी घेतली आहे.
राजकीय प्रवास
राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असून याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. राज्याच्या राज्यपाल पदाची सुत्रे त्यांनी 31 जुलै 2024 पासून हाती घेतली आहेत. तर फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 त्यांच्याकडे झारखंडसह तेलंगणा आणि पुदुच्चेरीचेही अतिरिक्त कार्यभार होता.
ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य होते. ते कोईम्बतूरमधून दोनदा लोकसभेवर निवडून गेले असून तमिळनाडूमधील भाजपचे त्यांनी 2004-2007 दरम्यान प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांनी केरळ भाजपमध्ये देखील प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
93 दिवसांची रथयात्रा
2004-2007 दरम्यान तामिळनाडू भाजप अध्यक्ष म्हणून त्यांनी नद्यांना जोडणे, दहशतवादाविरोधात भूमिका, अस्पृश्यता निर्मूलन या मुद्यांवर काम केलं आहे. तसेच या मुद्द्यांवर त्यांनी 93 दिवसांची रथयात्रा काढली होती. संसदेत वस्त्र उद्योगावरील समितीचे अध्यक्ष तसेच वित्तीय व सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित अनेक समित्यांवर काम केले.
प्रश्न 1: नव्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कधी होणार?
👉 9 सप्टेंबर 2024 रोजी निवडणूक होणार आहे.
प्रश्न 2: एनडीए उमेदवार कोण आहेत?
👉 महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव एनडीएने जाहीर केले आहे.
प्रश्न 3: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी का राजीनामा दिला?
👉 त्यांनी आरोग्य कारणे सांगितली, मात्र विरोधकांनी केंद्राशी मतभेद असल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.