Aditi Tatkare on NCP. Sarkarnama
विदर्भ

Bhandara : ‘पवारसाहेब देशाचे, राष्ट्रवादीचे नेते; पण निवडणूक आयोग ठरवेल पक्ष कोणाचा!

अभिजीत घोरमारे

NCP Politics : ‘शरद पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, देशाचे नेतृत्व करतात. ते देशाचे, राष्ट्रवादीचे नेते. पण राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलची वस्तुस्थिती सर्वश्रूत आहे. निवडणूक आयोग ठरवेल पक्ष कोणाचा ते’, असा खोचक टोला लगावत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

सरपंच मेळाव्याच्या निमित्ताने शनिवारी (ता. 23) भंडारा येथे आल्यानंतर आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील परिस्थितीवर भाष्य केले. निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहेत. आयोग ठरवेल राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आपले आहे, असे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना नमूद केले होते. त्यावर अजित पवार यांनी आपण भाजपच्या कमळावर निवडणूक लढणार नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू असे म्हटले होते. अदिती तटकरे यावर म्हणाल्या की, हे प्रकरण सध्या निवडणूक आयोगाकडे सुनावणीसाठी आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे चुकीचे ठरेल. लवकरच याबाबत निर्णय लागेलच अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासंदर्भात बोलताना तटकरे म्हणाल्या की, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या हक्कभंगाच्या विषयात चुकीची कारवाई करू शकत नाहीत. सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग नोटीस देण्याची कारवाई त्या विधिमंडळ कायद्यांचा बारकाईने अभ्यास करूनच करतील. आजपर्यंत तरी गोऱ्हे यांनी चुकीचे किंवा नियमबाह्य काम केल्याचे ऐकिवात नाही, असे त्या म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. हे प्रमाण आखणी कमी करण्यासाठी बालविकास, शिक्षण आणि आरोग्य या तीन विभागांचा समन्वय गरजेचा आहे. तसे झाल्यास महाराष्ट्र 'बालमृत्यूमुक्त' होईल. बालमृत्यूचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. यासंदर्भातील अहवालही आला आहे. त्यातील आकडेवारी सर्व स्पष्ट करते. महिला व बालविकास विभागाचा हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी केवळ कोणत्याही एका विभागाला काम करून चालणार नाही. शासनाच्या तीन विभागांचे संयुक्त प्रयत्न यासाठी लागणार आहेत.

‘न्यूड डान्स’बाबत आयोगाला भेटणार

भंडारा जिल्ह्यातील मंडईत एका अल्पवयीन युवतीला पूर्ण विवस्त्र करून झालेल्या ‘न्यूडडान्स’चे प्रकरण गंभीर आहे. एका मंडई कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील सभापतीनेही नृत्य करणाऱ्या मुलीवर पैसे उडविले होते. ‘सरकारनामा’ने या दोन्ही प्रकरणांचा पर्दाफाश केला होता. यासंदर्भात विचारल्यानंतर तटकरे म्हणाल्या की, महिला व बालविकास मंत्री म्हणून आपण महिला आयोगाशी याबाबत बोलणार आहोत. कोणीही कोणत्याही पक्षाचा का असेना पैसे उधळण्याचा प्रकार चुकीचा आहे, असे त्या म्हणाल्या.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT