Eknath Shide, Ajit Pawar & Devendra Fadnavis. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal : अजित पवारांची दादागिरी? पालकमंत्र्यांनाही कळले नाही अन‌्....

सतीश हरिश्चंद्र येटरे

Ajit Pawar : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात गेली दोन वर्ष सर्व शासकीय, अशासकीय समित्या सदस्यांच्या प्रतीक्षेत आहे. सरकारध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पालकमंत्र्यांना डावलून यवतमाळ जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांची नियुक्ती केली. ही निवड करताना शिवसेना आणि भाजपला विश्वासात न घेतल्याने सत्ताधारी पक्षांत समन्वय नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या विकासाबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयात जिल्हा नियोजन समितीचे महत्वाचे योगदान असते. याशिवाय सत्ताधारी पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांची सन्मानजनक सोय करण्याची हक्काची जागा नियोजन समिती आहे. या समितीवर जाण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गट व भाजपने अद्यापही अनेक शासकीय, अशासकीय समित्यांवर नेमणूक केलेली नाही. जिल्हा नियोजन समितीवर प्रारंभी शिवसेना एकनाथ शिंदे गट व भाजपच्या प्रत्येकी सहा कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचे ठरले होते. मात्र कोणाला संधी द्यावी, याबाबत दोन्ही पक्षांत अद्यापही एकमत झाले नाही.

मध्यंतरीच्या काळात राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार सहभागी झाले. त्यामुळे नियोजन समितीत प्रत्येक पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा आल्या. परंतु शिवसेना, भाजपने समितीवर कोणाला पाठवायचे हे ठरवलेच नाही. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री पदाची सूत्रे अजित पवारांनी स्वीकारली. त्याचा फायदा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करून घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा नियोजन समितीवरील जागा रिक्त असल्याने या भरण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना भेटून केली. अजित पवार यांनी या मागणीची तातडीची दखल घेत जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे (पुसद), क्रांती राऊत (यवतमाळ), प्रा. सीताराम ठाकरे आणि अब्दुल वहाब अब्दुल हलीम यांची विशेष निमंत्रित म्हणून शासनाकडून निवड केली. या नियुक्तीचा आदेशच वित्त विभागाने काढला आहे. या नियुक्तीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील भापजच्या पाचही आमदार या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. नियोजन समितीसाठी शिवसेना, भाजपातील अनेकजण बाशिंग बांधून तयार असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजप, शिवसेनेला जोरदार झटका देत बाजी मारली आहे.

परस्पर निर्णय घेतला : राठोड

जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर घेतला. नियोजन समितीत सत्ताधारी तीनही पक्षांना प्रत्येकी चार जागांचा ‘फॉर्म्यूला’ ठरला होता. तीनही पक्षांच्या प्रमुखांनी नावांवर शिक्कामोर्तब करणे आवश्यक असताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या नियुक्तीचा थेट आदेशच काढला. आपल्याला याबाबत काहीही कल्पना नव्हती, असे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. आता शिवसेना एकनाथ शिंदे गट व भाजपच्या प्रत्येकी चार सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राठोड यांनी दिली.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT