Yavatmal : खासदार भावना गवळी यांना पुन्हा नोटीस; यावेळी कुणी मागितला हिशोब?

Bhavna Gawali : महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील प्रत्येक पैशांच्या व्यवहाराचा मागितला पुरावा
Bhavana Gawali Income Tax Notice
Bhavana Gawali Income Tax NoticeSarkarnama

Shivsena Politics : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या आणि यवतमाळ-वाशीम मतदार संघाच्या लोकसभा खासदार भावना गवळी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारतीय आयकर कायद्याच्या कलम 131 (1A) कलमानुसार खासदार गवळी यांना आयकर विभागाने काही हिशोब मागवले आहेत.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्याबाबतची ही नोटीस आहे. नोटीसला त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 5) उत्तर द्यायचे आहे. आयकर विभागाने खासदार गवळी यांना बजावलेली नोटीस 29 डिसेंबर 2023 रोजी काढली होती.

Bhavana Gawali Income Tax Notice
Yavatmal News : पथारी व्यावसायिकांकडून महिन्याला 'वसुली'; राष्ट्रवादीचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप

महिला आणि तरुणींना प्रशिक्षित करण्याच्या उद्देश्याने खासदार भावना गवळी यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानची सुरुवात केली होती. 27 नोव्हेंबर 1998 पासून हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. खासदार गवळी या स्वत: प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयुर्वेद महाविद्यालय चालविण्यात येते. वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे हे आयुर्वेद महाविद्यालय आहे. याशिवाय देगाव येथे फार्मसी संस्था, पब्लिक स्कूल, शिरपूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, सिनीअर कॉलेज, प्राथमिक शाळा, निवासी शाळा, वाशीम आणि यवतमाळ जन शिक्षण संस्था चालविण्यात येतात.

याच महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील 19 कोटी रुपयांचा हिशोब आता आयकर विभागाला हवा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस बजावली होती. 2022 मध्ये हे प्रकरण चांगलेच गाजले होते. चौकशीला हजर न राहिल्यास भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढले जाण्याची शक्यताही त्यावेळी वर्तविण्यात आली होती. यासंदर्भात त्यांना तीन समन्सही पाठविण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सक्तवसुली संचलनालयाने गवळी यांच्याशी संबंधित काही ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान नामक व्यक्तीला अटक करण्यात आली होती. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक आहेत. सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे गवळी यांना याआधी 4 ऑक्टोबरला 2022 रोजी समन्स बजावले होते. चिकनगुनिया झाल्याचे सांगत त्यावेळीसुद्धा भावना गवळी चौकशीला अनुपस्थित राहिल्या होत्या. हे प्रकरण देखील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे होते.

ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातदेखील गैरव्यवहार झाला. एकूण घोटाळा 18 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप तेव्हा झाला होता. सात कोटी रुपयांच्या रोख रकमेचादेखील गैरवापर करण्यात आल्याचा ठपका आहे. आपल्या स्वीय सहाय्यकाने संस्थेत कोट्यवधींचा अपहार केला आहे, अशी पोलिस तक्रार भावना गवळी यांनीच 2020 मध्ये केली होती. त्या आधारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न उपस्थित करत सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली आणि गवळी व सईद यांच्याविरोधातच गुन्हा नोंदवला होता. अशात आयकर विभागाने यासंदर्भात पुन्हा गवळी यांना नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Bhavana Gawali Income Tax Notice
Yavatmal: उसणवारीच्या पैशातून वाद विकोपाला; महिलेची चाकूने हत्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com