Nagpur Politics Sarkarnama
विदर्भ

Nagpur Politics : एकही जागा मिळणार नाही, तरीही शिवसेना आणि 'NCP'ला कमळाचं...

BJP will contest six assembly seats in Nagpur : नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर शहरात भाजप किती जागा लढणार? मित्रपक्षांसाठी किती जागा सोडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहापैकी एक विधानसभा मतदारसंघ दिला जाईल, अशीही चर्चा होती.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी भाजपच सर्व सहापैकी सहा जागांवर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'कमळा'चे काम करण्याचे आवाहन केले.

शिवसेनेसोबत युती असताना भाजप पाच विधानसभा मतदारसंघात लढत होती. दक्षिण नागपूर शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. युती आणि आघाडी तुटल्यानंतर दक्षिण नागपूरही शिवसेनेच्या हातून गेले. इथं भाजपचे (BJP) मोहन मते आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्यानंतर शिवसेनेने एका जागेची अपेक्षा केली होती.

मध्यंतरी भाजपचा आमदार नसलेला उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला जाईल, अशी चर्चा होती. ती आता फोल ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची मागणी केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आमदार आहेत. नागपूर शहरातील उर्वरित चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे मागण्यासाठी उत्तर आणि पश्चिम हे दोनच पर्याय भाजपच्या मित्रपक्षासाठी उपलब्ध होते. तेसुद्धा आता बंद झाले आहेत.

भाजपने 2014 च्या निवडणुकीत शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. तेव्हा युती आणि आघाडी फुटली होती. प्रत्येक पक्ष स्वबळावर लढला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या हातून उत्तर आणि पश्चिम दोन मतदारसंघ गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात फारसे अस्तित्व नाही. हे सुद्धा एक कारण सर्व सहा जागांवर दावा करण्यामागचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT