Akola APMC
Akola APMC Sarkarnama
विदर्भ

Akola APMC Election Analysis : राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसला तोड मिळाला, वंचितचा सहकारात शिरकाव !

मनोज भिवगडे

APMC Election Results Analysis : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच नको तेवढ्या प्रमाणात पक्षीय राजकारणाला महत्त्व आले. यापूर्वी सहकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांचे गड. त्यांच्या संपूर्ण राजकारणाचे सूत्र बाजार समितीच्या ‌संचालक मंडळाच्या माध्यमातून हलत होते. त्याला अकोला जिल्ह्‍यात तरी यावर्षी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतून छेद मिळाला, असे म्हणता येईल. (Party politics gained importance to an undesired extent)

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात भाजपचे निवडून आलेले पाच संचालक आणि तेल्हारा बाजार समिती वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मदतीने ताब्यात घेऊन प्रस्थापितांना धक्का दिला आहे. सहकारातील हा बदल तसा बघितला तर फारच किरकोळ. मात्र, येणाऱ्या काळातील मोठ्या बदलाचे संकेत देणारा आहे. यात कुणाचेही दुमत नसावे.

अकोला, तेल्हारा, अकोट हे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे गड. अनेक सहकार नेते या तीन तालुक्यांतीलच. आजही सहकार क्षेत्रावर या तीन तालुक्यांचीच पकड आहे. त्यामुळे सहकारातील बदलाची सुरुवात या तालुक्यांतूनच होत असल्याने त्याला अधिक महत्त्व आले आहे. अर्थातच ही निवडणूक सहकार क्षेत्रात शिरकाव करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसह इतरांना मार्ग दाखवणारी तर प्रस्थापितांना सावध‌ करणारी ठरली. सहकारातील दिग्गज म्हणविणाऱ्या नेत्यांची पकड सैल होत चालली असल्याचे संकेत देणारी निवडणूक म्हणूनही याकडे बघितले जात आहे.

सहकारातील घराणेशाही मात्र रुजली..

सहकारात नवीन चेहरे दिसू लागले असले तरी अकोला जिल्ह्यात सहकार रुजविणाऱ्या घराण्यांतीलच नेत्यांचा वारस चालविणारे हे नवीन चेहरे आहेत. काही अपवाद वगळता जिल्ह्यातील धोत्रे, कोरपे, सावरकर कुटुंबांभोवतीच सहकार घुटमळताना दिसतो आहे.

आंबेडकरांचे सोशल इंजिनिअरिंग बाजार समितीत पोहोचले..

बाजार समितीची निवडणूक सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची. येथूनच जिल्ह्यातील राजकारणाचे सूत्र हलतात. त्यामुळे येथील पकड घट्ट कशी होईल यावर नेत्यांचा भर असतो. हे ओळखून ‌अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे सोशल इंजिनिअरिंग बाजार समितीच्या निवडणुकीत राबवीत राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत मतदार संघाने त्यांना बळ दिले.

राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला भाजपचे आव्हान..

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकतर्फी वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपने शिवसेनेला बळ देत तब्बल सात सदस्य निवडून आणले. त्यासाठी खुद्द आमदार रणधीर सावरकर यांनी प्रयत्न केले. भाजपचे पाच व शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदावर असलेले दोन सदस्य निवडून आलेत.

अकोल्याचा (Akola) प्रयोग मूर्तिजापूरमध्ये माजी आमदार भैय्यासाहेब तिडके यांच्या विरोधात करून भाजपने (BJP) तीन सदस्य निवडून आणले तर बार्शीटाकळीमध्ये काँग्रेसचे (Congress) धाबेकर गटाचे वर्चस्व कमी करीत भाजपने तीन व शिवसेनेचे (Shivsena) दोन सदस्य निवडून आणलेत. हा बदल सहकारातील बदलाचे संकेत असल्याचे मानले जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT