Congress Leaders at Press Conference at Akola
Congress Leaders at Press Conference at Akola Sarkarnama
विदर्भ

Akola Congress News : अकोल्यात झाली नागपूरची पुनरावृत्ती; वरिष्ठांसमोरच कॉंग्रेस नेते भिडले!

मनोज भिवगडे

Akola District Congress Political News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये माध्यमांसमोरच हमरीतुमरी झाली. यातून एकाने दुसऱ्याला बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला. विशेष म्हणजे, ही घटना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोरच घडली. (Accused of threatening to blow up with a gun)

परवा परवा नागपुरातही वरिष्ठ नेत्यांसमोर व्यासपीठावरच कॉंग्रेसचे दोन नेते भिडले होते. प्रकरण हाणामारीपर्यंत आले होते. त्यानंतर आज (ता. १७) अकोल्यात ही घटना घडली. त्यामुळे कॉंग्रेस नेते आता तरी ‘सीरिअस’ होणार आहेत की नाही, अशी चर्चा या घटनेनंतर शहरात सुरू होती.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर काँग्रेस करणार असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आज मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलाविली होती. शासकीय विश्रामगृहात आयोजित ही पत्रकार परिषद आटोपल्यानंतर एकत्रित छायाचित्र काढत असताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील आणि प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्यात उभे राहण्याच्या शुल्क कारणावरून वाद झाला.

दोघेही हमरीतुमरीवर आले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही या प्रसंगी उपस्थित होते. डॉ. अभय पाटील हे सभागृहातून धावत बाहेर आले आणि ते त्यांच्या गाडीकडे धावत गेले. त्यावेळी त्यांनी गाडीत ठेवलेली पिस्टल काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

काही माध्यम प्रतिनिधी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. डॉ. अभय पाटील यांच्या मागेच मदन भरगड हेसुद्धा बाहेर आलेत व त्यांनी आत घडलेल्या प्रकार माध्यमांपुढे कथन केला. डॉ. पाटील यांनी बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही या वेळी भरगड यांनी माध्यमांशी बोलताना केला.

वरिष्ठ नेत्यांपुढेच दोन नेते भिडले...

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी व माजी राज्यमंत्रीसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासोबतच एकत्र छायाचित्र काढण्यासाठी सर्व पदाधिकारी उभे असताना हा वाद घडून आला. दोन्ही नेते आपापसात भांडत असताना वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला.

बैठकीतील वाद उफाळून आल्याची चर्चा...

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मदन भरगड यांनी उमेदवारीवरून काही टिप्पणी केल्याची माहिती आहे. माध्यमांशी बोलताना भरगड यांनी या विषयाचा उल्लेखही केला. पॅराशूट लावून पक्षात आलेल्या नेत्‍यांना उमेदवारी कशी देणार, असा प्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केला होता. त्यावरून हा वाद झाल्याचा दावा भरगड यांनी केला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून प्रतिक्रिया देण्यास नकार...

काँग्रेसने दिलेल्या पत्रकार परिषदेनंतर दोन नेत्यांमध्ये वाद झाला. नेत्यांच्या पुढेच हा वाद झाला असतानाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी माध्यमांसोबत बोलताना काय घडले, याबाबत माहिती नसल्याचे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल पाठविणार?

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर प्रदेश कार्यकारिणीतील दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये माध्यमांपुढेच वाद झाला. या वादासंदर्भात जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे अहवाल पाठविणार असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT