Akola Congress Leaders Sarkarnama
विदर्भ

Akola Congress News : दोन पदाधिकाऱ्यांमधील वादानंतर पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष !

जयेश विनायकराव गावंडे

Akola District Congress Political News : नागपुरातील काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या वादाची घटना ताजी असताना फोटोसाठी उभे राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंतचा प्रकार अकोल्यात घडला. काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि पत्रकारांसमोर हा प्रकार घडल्याने यावर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (The controversy in Akola Congress has once again come to the fore)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अकोला काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसतशी जिल्ह्याच्या काँग्रेसमधील अंतर्गत खदखद वाढली असून, पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण केले जात आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील असंतोषामुळे पक्ष कमकुवत होत आहे. अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी, पक्षांतर्गत वाद, एकमेकांना डावलणे, नाराजीचा सूर आदी प्रकार काही नवीन नाहीत.

प्रदेशाध्यक्षांसमोरच दोन गटांत राडा

या प्रकारांमुळे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्तेही दुरावले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अकोल्यातील काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीची पक्षश्रेष्ठींनी दखल घेण्याची गरज आहे. नागपूर येथील बैठकीत काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचा प्रकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच घडला. ही घटना ताजी असतानाच अकोल्यातही या घटनेची पुनरावृत्ती झाली. काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी आणि पत्रकारांसमोरच दोन नेत्यांमधील पदाधिकारी यांच्यातील वाद विकोपाला गेला.

स्थानिक विश्रामगृहात काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषद आटोपताच काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी असलेले डॉ. अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यात फोटो काढण्यासाठी उभे राहण्याच्या जागेवरून वाद झाला. या वादानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली.

नागपुरात झालेल्या घटनेनंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने संबंधित पदाधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. नागपूरच्या घटनेची पुनरावृत्ती अकोल्यात झाल्याने आता या प्रकरणी काँग्रेसची शिस्तपालन समिती, पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्षांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न...

पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांमधील वाद सुरू असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. मात्र, या वादानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी असं काहीच झालं नसल्याचे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. पक्षात सारं आलबेल असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अंतर्गत वाद ठरू शकतो घातक...

आधीच गटागटांत विभागलेल्या अकोला जिल्हा काँग्रेसमधील वाद काही नवीन नाही. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला अकोला जिल्ह्यात काँग्रेस गेल्या दोन दशकांपासून रसातळाला गेली आहे. आगामी निवडणुकीसाठी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असताना काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस वाढली आहे.

काँग्रेसमधील हा वाढता अंतर्गत वाद काँग्रेसला आगामी निवडणुकांसाठी घातक ठरू शकत असल्याचे बोलले जात आहे. याच गटागटांच्या राजकारणामुळे काँग्रेसमधील निष्ठावान कार्यकर्तेही दुखावत चालले आहेत. या सर्व प्रकारातून काँग्रेसचे सातत्याने नुकसान होत असतानाही त्यातून धडा घेण्यास काँग्रेस नेते अद्यापही तयार नाहीत. काँग्रेसच्या या स्थितीचा लाभ विरोधी पक्षांनाच होण्याची शक्यता आहे.

पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज...

काँग्रेसमधील अंतर्गत वादाची ही मालिका थांबविण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अंतर्गत वाद, वर्चस्वाची लढाई हे प्रकार सर्वच राजकीय पक्षांत असतात. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत वाद वारंवार चव्हाट्यावर येत असल्याने आता पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT