खरीप हंगामाच्या तोंडावर अकोल्यातील कृषी निविष्ठाधारकांच्या गोदामांची तपासणी करण्यासाठी राबवलेली धडक मोहीम संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बुधवारी (ता, सात) सुरू झालेली ही मोहीम आज (ता. १०) कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पाठ फिरताच गुंडाळण्यात आली. याचा आमदार अमोल मिटकरींनी खरपूस समाचार घेतला. (The campaign was wrapped up today when Agriculture Minister Abdul Sattar turned his back)
या धडक मोहिमेवर अकोला जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे वैयक्तिक पथक होते काय, अशी विचारणा करीत या माध्यमातून वसुलीचा फंडा सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही मोहिमेचे वाभाडे काढले, सध्या शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. अन्यथा येत्या अधिवेशनात आवाज उठवू असेही आमदार मिटकरी म्हणाले.
तुमच्याकडे माल चांगला तर पळता कशाला ?
कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या तपासणीच्या अनुषंगाने बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याचा हंगाम वाया जातो. बोगस बियाणे, खते, औषधींमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. यंदा काही तक्रारी प्राप्त झाल्या असून राज्यात बियाणे, औषधी, खतांचा साठा असलेल्या ८७ ठिकाणी छापे टाकण्यात आहेत. त्यांपैकी ६८ ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे.
चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सर्वच संबंधितांवर कार्यवाही व्हावी, असे सांगत त्यांनी कंपन्यांचेही कान टोचले. जर तुमच्याकडे चांगला माल आहे तर घाबरता कशाला? गोदाम बंद करून पळ का काढता, असा चिमटा काढला. सत्तार हे एका कार्यक्रमासाठी अकोल्यात आले असताना बोलत होते.
बोगस बियाणे, औषधी, खते संबंधितांनी नष्ट करून टाकावेत; अन्यथा महाराष्ट्रातील कोणत्याही गोदामात असे बोगस आढळून आल्यास पकडण्यात येईल. पोलिस, महसूल आणि कृषी हे तीन विभाग संयुक्तपणे कार्यवाहीत सहभागी होतील, असा इशारा दिला. शेतकऱ्यांना (Farmers) बोगस बियाणे खते विकणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
१४ पथकांकडून तपासणी..
कृषी विभागाच्या १४ पथकातील ४० ते ४५ सदस्यांचा सहभाग असलेल्या पथकांकडून अधिकृतपणे तपासणी केली जात आहे. या पथकामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाने सुमारे ४० टक्के गोदाम ऐन खरिपाच्या तोंडावर सील केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलिसांमध्ये तक्रार..
अक्षत फर्टीलायजर ॲन्ड न्युट्रीशन प्रा. लि. रायपूर या कंपनीचे विक्री व्यवस्थापक राजेश शिंदे यांनी अकोला (Akola) येथील एमआयडीसी पोलिस (Police) स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तपासणी सुरू असताना हितेश सुरेश भट्टड या व्यक्तीने गोदाम व्यवस्थापकाला दमदाटी करून आत प्रवेश केला.
बायो पेस्टीसाईड व अन्य साहित्याची नासधूस केली. सरकारी अधिकाऱ्यांकडून कार्यवाही सुरू असताना त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली. सरकारी अधिकाऱ्यांसमोरच हे सर्व सुरू होते. तुम्हाला महाराष्ट्रात (Maharashtra) व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी भट्टडने दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.