Amol Mitkari and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Ambedkar And Mitkari News : चर्चा राजकीय खिचडीची, पण दोन्ही नेते म्हणाले, विजयादशमीनिमित्त होती ती भेट !

जयेश विनायकराव गावंडे

Akola District Political News : भारतीय बौद्ध महासभेतर्फे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा काल (ता. २५) अकोल्यात पार पडला. सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे दमदार भाषण झाले. त्यापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी ॲड. आंबेडकरांची भेट घेतली आणि मिरवणुकीमध्ये खिचडीही वाटली. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती ‘राजकीय खिचडी’ शिजवल्याची. (Adv. Ambedkar severely criticized NCP leader, Deputy Chief Minister Ajit Pawar)

सभेच्या अर्धा तास आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट जवळपास अर्धा तास चालली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत आमदार मिटकरींनी खिचडीचे वाटप केले. त्यानंतर सभेत ॲड. आंबेडकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टिका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभेच्या पूर्वी मिटकरींचे खिचडी वाटप आणि ॲड. आंबेडकरांची भेट, यामुळे राजकीय खिचडी शिजल्याची चर्चा सुरू झाली. यासंदर्भात या दोन्ही नेत्यांनी त्या भेटीमध्ये कुठलाही राजकीय विषय नसल्याचे स्पष्ट केले. ॲड. आंबेडकर म्हणाले, ही भेट विजयादशमीनिमित्त होती. विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मिटकरी आले होते. विशेष म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी आले असतानाही कुणी त्याला राजकीय भेट म्हणत असेल तर हे दुर्दैवी आहे.

यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून आमदार असताना आणि त्यापूर्वीची तीन वर्ष मी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभागी होत आलो आहे. मिरवणुकीदरम्यान आम्ही अन्नछत्र लावतो. कालही मी मिरवणुकीदरम्यान खिचडी वाटप केले. माझ्या घराच्या मागेच त्यांचे घर ‘यशवंत निवास’ आहे. मी दरवर्षी त्यांना विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा द्यायला जात असतो आणि याच वर्षी ही भेट राजकीय कशी काय ठरली, असा सवालही मिटकरींनी केला.

ॲड. आंबेडकर यांना घरी तुकाराम महाराज, शहाजी महाराजांचे पुस्तकं भेट दिली. सभा नऊ वाजता सुरू झाली आणि मी त्यांना पावणेआठ वाजता हार घातला. सभेच्या आधी माझी ॲड. आंबेडकर यांच्यासोबत भेट झाली. त्यानंतरच्या सभेत त्यांनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी मी काही नाही करू शकत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. शुभेच्छा भेटीला कुणी राजकीय भेट म्हणत असेल, तर हे त्यांच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे.

अजित दादा किंवा अन्य कुण्याही नेत्यावर टिका करणे, न करणे हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. त्याच्याशी वैयक्तिकरीत्या माझा कुठलाही संबंध नाही, असेही आमदार मिटकरी म्हणाले. मी अजितदादांच्या कट्टर समर्थक असल्यामुळे ही चर्चा कुणीतरी मुद्दामहून पसरवली असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

धम्मचक्र प्रवर्तन दीनानिमित्त विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात दरवर्षी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करतात. संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या मेळाव्याकडे असते. याच मेळाव्याच्या सभेत ॲड. आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर सडकून टीका केली.

सभेदरम्यान आंबेडकर यांनी, अजित पवार यांचा घोटाळा ७० हजार कोटीचा अन् सामान्याने १० हजार रुपये चोरले तर तो जेलमध्ये आणि ज्यांनी ७० हजार कोटी चोरले ते मोकळे. मोठ्या चोराला येथे अभय आहे. ज्यांना चौकशीला बोलावले त्यांना रस्त्यावरून फिरायचे की जेलमध्ये फिरायचे हे सांगण्यात आले. रस्त्यावर फिरायचे असेल तर मोदी, शाह जे सांगतात ते करा, नाही तर जेलमध्ये फेऱ्या मारा, अशी विकासाबाबत परिस्थिती आहे, असा घणाघात आंबेडकरांनी अजित पवारांवर केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT