Shivsena (Thackeray Group) Sarkarnama
विदर्भ

Amit Shah Akola Tour : अमित शाह येताच ठाकरे गटाचे पदाधिकारी नजरकैदेत; अकोल्यात काय घडलं ?

प्रसन्न जकाते

Akola Political News : पश्चिम विदर्भातील पाच व पूर्व विदर्भातील एक अशा एकूण सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह मंगळवारी (ता. ५) अकोला शहरात आले होते. शाह यांच्या या अकोला दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले. तसेच पोलिसांनी काही पदाधिकाऱ्यांना नजरकैदेतही ठेवले.

दरम्यान, रिधोऱ्याजवळ शाह (Amit Shah) यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर्स अज्ञात व्यक्तीने सोमवारी (ता. चार) फाडले होते. या घटनेनंतर अकोला पोलिस ‘अलर्ट’ झाले होते. त्यांची नजर विशेषत: शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांवर होती.

शाह यांचे शिवणी विमानतळावर आगमन होताच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात हालचाली सुरू झाल्या. त्यांच्या या हालचालींकडे पोलिस सकाळपासूनच पाळत ठेऊन होते. शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, तरुण बगेरे, नितीन ताकवाले, गजानन चव्हाण, शरद तुरकर, अनिल परचुरे यांच्यावर पोलिसांची नजर होती. शहरातील हॉटेल जलसा येथे भाजपचे नेते येत होते, तसतसा बंदोबस्त कडक करण्यात येत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाह यांचे आगमन झाल्याचे जाहीर होताच अकोल्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते घराबाहेर पडले. अकोला शहरातील पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यावर व जिल्ह्यातील समस्यांबाबत शाह यांना निवेदन देण्यासाठी ही मंडळी निघाली होती. शिवसेना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजेश मिश्रा (Rajesh Mishra) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने राजेश मिश्रा व त्यांच्या समर्थकांना रोखले.

यावर आपण कोणतेही आंदोलन करणार नसून जिल्हावासीयांच्या समस्यांची जाणीव केंद्रीय गृहमंत्र्यांना करून देण्यासाठी जात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यांना हॉटेल जलसाकडे जाण्यापासून रोखत तत्काळ ताब्यात घेतले. शाह यांचा दौरा आटोपत नाही, तोपर्यंत अशा सर्व संशयितांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अकोला दौऱ्यादरम्यानही राजेश मिश्रा व त्यांच्या समर्थकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा रस्ताही पोलिसांनी अडविला होता. त्यानंतरही ‘वंचित’च्या शिष्टमंडळाने भागवत यांना भेटण्याचा हट्ट केला होता. पोलिसांनी याबाबत संदेश दिल्यानंतर भागवत यांनी ही भेट नाकारली होती. मात्र, त्यांच्या स्वीय सहायकांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचे निवेदन स्वीकारले होते. शाह यांचा दौरा असल्याने या वेळीही असेच आंदोलन होऊ शकते, याची कुणकुण पोलिसांना आधीपासूनच लागली होती.

केंद्रीय व राज्यस्तरावरील दोन्ही गृहमंत्री अर्थात अमित शाह व देवेंद्र फडणवीस अकोल्यात असल्याने पोलिस कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीत नव्हते. मराठा समाजासह सर्व संभाव्य आंदोलनकर्त्यांवर पोलिस लक्ष ठेऊन होते. अशात यापैकी शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी कोणते ना कोणते आंदोलन करू शकते, याची खात्री पोलिसांना होती. त्यामुळे ठाकरे सेनेतील नेत्यांच्या घराबाहेर तर सकाळपासूनच नाकाबंदी करून पोलिस तैनात केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT