Amit Shah in Akola. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : पश्चिम विदर्भाच्या रणनीतीसाठी अमित शाह येणार अकोल्यात

BJP News : निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून दौऱ्याचे नियोजन

जयेश विनायकराव गावंडे

Akola Constituency : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. अशात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विदर्भ दौरा निश्चित करण्यात आला आहे. अमित शाह 15 फेब्रुवारीला अकोला दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा हा दौरा असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त झाले आहेत. सत्ता राखण्यासाठी भाजपनेही प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हानिहाय बांधणी सुरू करण्यात आली आहे. ‘मिशन 45’ साठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता विदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होणार आहे.

अमित शहा 15 फेब्रुवारीला अकोल्यात येणार आहेत. विदर्भातील लोकसभा मतदारसंघनिहाय तयारीचा आढावा गृहमंत्री अमित शाह अकोला येथे घेणार आहेत. पश्चिम विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ- वाशिम आणि बुलढाणा या मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांशी अमित शाह संवाद साधणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठे यश मिळाले होते. या निवडणुकीत ‘मिशन 45’चे लक्ष्य भाजपने डोळ्यापुढे ठेवले आहे.

राज्यातील मतदारसंघनिहाय जागांचा आढावा त्यासाठी घेण्यात येत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ गेल्या 20 वर्षांपासून भाजपचा अभेद्य गड आहे. काँग्रेसचा पूर्वी परंपरागत असलेला हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर भाजपने अकोल्यात मागे वळून पहिलेच नाही. 1998 आणि 1999 मध्ये काँग्रेसच्या मदतीने प्रकाश आंबेडकर हे विजयी झाले होते. त्यानंतर सातत्याने या मतदारसंघावर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार संजय धोत्रेंनी प्रकाश आंबेडकर यांचा दारुण पराभव केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार संजय धोत्रे हे निवडणूक लढविणार नाहीत. या निवडणुकीत ‘नया साल नया खासदार’ असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ‘वंचित’चा समावेश महाविकास आघाडीत व्हावा यासाठी ‘वंचित’कडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजपला लोकसभेत यश मिळू नये, यासाठी आपण महाविकास आघाडीत जात असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही आंबेडकरांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात निवडून येण्याची तयारी ‘वंचित’कडून करण्यात आली आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रकाश आंबेडकर यांना हरविण्यासाठी आणि भाजपचा गड राखण्यासाठी जोरदार तयारी भाजपकडून होत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: मतदारसंघावर लक्ष देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT