SSC paper leak Case Sarkarnama
विदर्भ

Paper Leak Case : SSC इंग्रजी पेपरमध्ये सेटिंगचा स्फोट? अमरावतीत पेपर फुटल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक

education officer arrested in paper leak Case : नागपुरमध्ये 12 मी विज्ञान शाखेचे तीन पेपर फुटल्याची घटना ताजी असतानाच आता अमरावतीत दहावीचाही पेपर फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक केली असून दोन कर्मचारी फरार आहेत.

Aslam Shanedivan

  1. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे 10वी इंग्रजी विषयाचे दोन पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली आहे.

  2. गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांना अटक करण्यात आली असून दोन कर्मचारी फरार असल्याची माहिती आहे.

  3. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Amaravati News : नागपुरमध्ये बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स विषयांच्या पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीत दहावीचाही पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यासह एकास अटक करण्यात आली असून दोन कर्मचारी अद्याप फरार असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे घडली असून इंग्रजी विषयाचे दोन पेपर फुटले आहेत. यात एक उर्दू माध्यमाचा आणि एक इंग्रजी माध्यमाचा असल्याचे आता समोर येते आहे.

नागपुरमध्ये बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स विषयाचा पेपर फुटल्याने पेपरफुटीनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. ज्यानंतर बोर्डाने तातडीने कस्टोडियन ते केंद्रप्रमुखांच्या बैठका घेऊन सूचना दिल्या होत्या. तर चौकशीत ‘रनर’द्वारे हा प्रकार घडल्याची शक्यता बोर्डाकडून व्यक्त केली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक केलीय. पेपरफुटीच्या प्रकरणावर बोर्डाने आता संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी बोर्डाकडून लवकरच एक समिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान आता अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे 10वीचा इंग्रजीचा पेपर फोडल्याचे समोर येत आहे. इंग्रजी विषयाचे दोन पेपर ज्यातील एक उर्दू माध्यमाचा आणि एक इंग्रजी माध्यमाचा पेपर लिक करण्यात आला. शाळेच्या कस्टडीत असणारे दोन्ही पेपर बाहेर गेल्याने एकच खळबळ उडाली.

अंजनगाव सुर्जी पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडेंसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. हा प्रकार शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाच्या लक्षात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने अंजनगाव सुर्जी येथील दहावीचे पेपर असलेल्या कस्टडीला भेट दिली. यावेळी उपनिरीक्षक सुनीलकुमार अभ्यंकर व अनिल हाडोळे हे दोन्ही व्यक्ती तिथे आले. यापैकी अनिल हाडोळे यांच्या शर्ट खाली कमरेमध्ये दोन पेपर एक उर्दू माध्यमाचा व एक इंग्रजी माध्यमाचा असे दोन पेपर संगणमताने बाहेरून कस्टडीमध्ये आणण्यात आल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे.

तर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प. अमरावती श्रीमती रजनी शिरभाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे परिरक्षक सुधीर खोडे, उप परिरक्षक सुशील कुमार अभ्यंकर, खाजगी इसम अनिल हाडोळे याच्यांसह 2 अज्ञात विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच त्यांच्यावर कट करून इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाची सोडवलेल्या 2 उत्तर पत्रिका विहित वेळेत कस्टडीमध्ये जमा केल्या नाहीत या प्रकरणी कलम 316 (5),318 (3)( 4), 61 (2) BNS सह कलम 5,7,8 महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

FAQs :

1. कोणत्या विषयाचा पेपर फुटला आहे?
10वीचा इंग्रजी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.

2. या प्रकरणात कोणाला अटक झाली?
गटशिक्षणाधिकारी यांना अटक करण्यात आली आहे.

3. किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे?
सुधीर खोडे, सुशील कुमार अभ्यंकर आणि अनिल हाडोळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4. दोन कर्मचारी फरार असल्याचे का सांगितले जाते?
घटनेनंतर दोन संबंधित कर्मचारी फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

5. पुढील कारवाई काय अपेक्षित आहे?
पोलिस तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध आणि पुढील कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT