Bachchu Kadu Shiv Sena merger Sarkarnma
विदर्भ

Bachchu Kadu Shiv Sena merger : बच्चू कडूंच्या 'प्रहार'च्या शिंदे शिवसेनेतील विलिनीकरणावर भाजप सावध? केंद्रीय पातळीवर हालचाली, रोखणार की होणार?

Amravati leader Bachchu Kadu announces merger of Prahar Janshakti Party with Eknath Shinde-led Shiv Sena, while BJP adopts a cautious stance : एकनाथ शिंदे शिवसेनेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे विलिनीकरणाचा निर्णय आज होत असून, त्या पार्श्वभूमीवर भाजप सावध झालं आहे.

Pradeep Pendhare

Amravati political news : मूळ शिवसैनिक असलेले, आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आज थोड्याच वेळात, एकनाथ शिंदे शिवसेनेत विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करणार आहेत.

तत्पूर्वी महायुतीमधील प्रमुख भाजप मात्र सावध झाला आहे. या विलिनीकरणामुळे विदर्भातील राजकारणात एकनाथ शिंदे शिवसेनेचं वजन वाढणार असून, त्याचा थेट फटका भाजपला बसेल, असे वरिष्ठ नेत्यांचे निरीक्षण आहे. या नेत्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांकडे धाव घेतली असून, तेथून काय सूत्र हालतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची महायुतीत एन्ट्री एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरणार असली, तरी भाजपसाठी ती अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे त्यांना न घेणे युतीसाठी फायदेशीर ठरेल, असा युक्तिवाद वरिष्ठ पातळीवर करण्यात येत आहे. केंद्रीय पातळीवरून त्यासाठी सूत्रे हलविण्यात येत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढविल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कडू यांना रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलल्या जात आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेकडून (Shivsena) माजी राज्यमंत्री तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. खुद्द बच्चू कडू यांनी यास दुजोरा दिला असून अटींवर आधारित ही ऑफर असल्याने राजकीय संधी स्वीकारायची, की आहे त्याच मार्गाने जात राहायचे हे निश्चित झाले नसल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असून, ते आज निर्णय जाहीर करणार आहे.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यात सत्तारूढ महायुतीच्या एकनाथ शिंदे शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना ही संधी देण्यात येत आहे. त्यासाठी कडू यांच्यासोबत चर्चाही झाली असून एकनाथ शिंदे शिवसेनेकडून अट समोर करण्यात आली आहे. या अटीनुसार बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करायचा आहे. कडू यांना यापुढे मंत्रिपदही दिल्या जाऊ शकते, असेही बोलल्या जात आहे.

मूळ शिवसैनिक असलेल्या बच्चू कडू यांनी राजकीय मतभेदांमुळे सेनेतून बाहेर पडून 1999 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत या पक्षाने मोठी भूमिका बजावली आहे. अचलपूर मतदारसंघात ते स्वतः चार वेळा निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिलेत.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शेतकरी कर्जमाफी आंदोलनाने ते गेल्या वर्षभरात प्रकाशझोतात आले असून फडणवीस सरकारला आंदोलनाची दखल घेऊन कर्जमाफी योजना जाहीर करावी लागली आहे. आता त्यांना एकनाथ शिंदे शिवसेनेने विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्याची ऑफर दिल्याने राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत.

शिंदेंची ही ऑफर शिवसेनेचे विदर्भातील स्थान बळकट करण्यासाठी आहे का? विलीनीकरण केल्यास प्रहार व पर्यायाने बच्चू कडू यांच्या राजकीय अस्तित्वाचे काय, राजकीय पुनर्वसनासाठी प्रहार पक्षाला तिलांजली द्यायची का? असे नानाविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT