Amravati News : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेत विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच विद्यार्थिनींना ‘भूतबाधा’ झाल्याच्या अफवांनी खळबळ उडाली होती. तर या या अफवांमुळे तब्बल 300 हून अधिक विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. आता या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून अफवा संपवण्यासह विद्यार्थिनींमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी कंबर कसली आहे.
यासाठी मेळघाटचे आमदार केवळराम काळे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट डोमा आश्रमशाळेत अर्ध्या रात्रीपर्यंत मुक्काम केला. प्रशासनाच्या या कृतीमुळे विद्यार्थिनींना मोठा धीर मिळाला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत भूताच्या अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे शाळेत परतण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये आणि आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जुन्या इमारतीतील वसतिगृहाचे नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. या नवीन इमारतीत जवळपास ३०० विद्यार्थिनींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींच्या मनातील भीती आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रमही राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून सप्तखंजिरी वादक संदीप पाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः शाळेत मुक्काम करून विद्यार्थिनींना दिलेला धीर आणि सुरक्षिततेचा विश्वास यामुळे डोमा आश्रमशाळेतील भीतीचे वातावरण कमी होऊन विद्यार्थिनी पुन्हा शाळेत परततील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थिनींनी शिक्षणासाठी निर्भयपणे शाळेत यावे, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने या निमित्ताने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.