Amravati MLC Election: विधानपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि संभाव्य बंडखोरीची समीकरणे समोर येऊ लागली आहेत. महायुतीच्या जागावाटपात अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे निश्चित मानले जाते. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तबही झाला आहे. मात्र, अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी वेगळ्याच उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार दिलीप कडू यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरत शक्तिप्रदर्शन केले. कडू यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खोडके दाम्पत्याच्या उपस्थितीत मोठी सभा घेण्यात आली. यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिलीप कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या शक्तिप्रदर्शनातून कडू यांनी आपली संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.
या शक्तिप्रदर्शनाला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर आडबाले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर होण्याआधीच महायुतीतीलच काही नेते आणि लोकप्रतिनिधी वेगळ्या उमेदवाराच्या व्यासपीठावर दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीकडून शिवसेनेच्या किरण सरनाईक यांचे नाव पुढे असताना राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी दिलीप कडू यांच्या पाठीशी उभे राहणे हा केवळ स्थानिक राजकीय पाठिंबा आहे की महायुतीच्या अधिकृत समीकरणांना आव्हान देणारी भूमिका, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीसमोर यापूर्वीच उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास शिक्षक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला आहे.
२०२० मध्ये किरण सरनाईक यांनी अपक्ष म्हणून श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र सरनाईक यांनी शिवसेनेकडून मैदानात उतरण्याची तयारी केली असताना कडू यांना मिळत असलेला राजकीय पाठिंबा आणि देशपांडे यांची स्वतंत्र लढतीची भूमिका यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून मतदान २३ ऑक्टोबरला होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.