Yashomati Thakur Jaykumar Gore Sarkarnama
विदर्भ

Amravati Innova cars controversy : दुष्काळात मंत्र्यांसाठी 15 आलिशान इनोव्हा! यशोमती ठाकूरांचा सवाल, जयकुमार गोरेंचा पलटवार; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली

Yashomati Thakur questions the cost of 15 Innova cars at an Amravati Zilla Parishad event amid drought. Jaykumar Gore hits back : अमरावती जिल्हा परिषदेच्या पुरस्कार सोहळा आणि परिसंवादावरील खर्चावरून वाद; माहितीच्या अधिकारातून खर्चाचा तपशील मागवला, 'जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल', ठाकूर यांचा इशारा.

Pradeep Pendhare

Yashomati Thakur Jaykumar Gore controversy : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना अमरावती जिल्हा परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' पुरस्कार सोहळा आणि परिसंवादाच्या खर्चावरून राजकीय वाद पेटला आहे.

या कार्यक्रमासाठी मंत्र्यांच्या सेवेसाठी तब्बल 15 आलिशान इनोव्हा गाड्या बुक करण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल करत त्यांनी कार्यक्रमाच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. त्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकूर यांच्यावर टीका केली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील संघर्षाला नवे निमित्त मिळाले आहे.

अमरावती (Amravati) जिल्हा परिषदेकडून 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत पुरस्कार सोहळा आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यातील दहा मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात आले होते. मंत्र्यांसाठी 15 आलिशान इनोव्हा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती, तर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कार्यक्रमावर झालेल्या खर्चाचा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या खर्चाची माहिती मागवली असून, माहितीच्या अधिकारातूनही तपशील मागवण्यात आला आहे.

या वादावर प्रतिक्रिया देताना भाजपचे (BJP) ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील दहा मंत्र्यांना निमंत्रित करणे हा शिष्टाचार आणि औपचारिकतेचा भाग होता. मात्र, सर्व दहा मंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून वेळ घालवणे उचित ठरले नसते, असे गोरे म्हणाले. यशोमती ठाकूर या दिल्लीच्या जंतर-मंतरची भाषा बोलतात. त्यांचा दिल्लीशी संपर्क जास्त आणि गावखेड्याशी कमी आहे. त्या स्वतःला नेत्या म्हणवून घेतात. त्यामुळे अभ्यास करून बोलतील, असे वाटले होते. मात्र, गावांच्या कौतुकाच्या सोहळ्याचे स्वागत करण्याऐवजी त्या टीका करत बसल्या, असा टोला गोरे यांनी लगावला. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांनी त्यांच्या विचारांचा अंश तरी आपल्या बोलण्यात आणावा, असा सल्लाही त्यांनी ठाकूर यांना दिला.

हा खरा ग्रामविकास आहे का?

जयकुमार गोरे यांच्या टीकेला यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. आपण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे नाव घेतलेच नव्हते. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना एखाद्या संमेलनासाठी 18, 16 किंवा 15 कितीही वाहने भाड्याने आणली, तरी जनतेच्या पैशांतून एवढा खर्च कशासाठी केला जात आहे, हा आपला साधा प्रश्न होता, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर चालणारी माणसे आहोत. सर्वधर्मसमभाव, ग्रामविकास आणि समाजहित हीच आमची विचारधारा आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांवर मागील पंधरा वर्षांत झालेला विकास समजून घ्यायचा असेल, तर त्याचा अभ्यास करावा, असेही ठाकूर म्हणाल्या.

भाजपने ग्रामविकासाची यंत्रणा कमकुवत केली

भाजप सरकारने ग्रामविकासाची यंत्रणा कमकुवत केली असून सरपंचांचे अधिकार कमी केले आहेत. पूर्वी ग्रामपंचायतींना केंद्र सरकारकडून थेट निधी मिळत होता. मात्र, आता विकासकामांसाठी सरपंचांना आमदार, खासदार आणि जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीवर अवलंबून राहावे लागते. हा खरा ग्रामविकास आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल'

गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरपंचांचे कौतुक व्हायलाच हवे. मात्र, दुसरीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना भाड्याच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल, तर त्याचा जाब विचारणारच, अशी भूमिका यशोमती ठाकूर यांनी मांडली. या कार्यक्रमावर नेमका किती खर्च झाला, जनतेच्या पैशांचा विनियोग कसा करण्यात आला, याची माहिती माहितीच्या अधिकारातून मागवण्यात आली आहे. त्यामुळे आता या खर्चाचा अधिकृत तपशील काय समोर येतो आणि त्यावर सरकार काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT