Shashikant Shinde : शेतकऱ्यांना 5 हजार, कुंभमेळ्यासाठी 36 हजार कोटी? तीन धरणांतील पाणी नियोजनावर शशिकांत शिंदेंचा सरकारला थेट सवाल!

Shashikant Shinde questions the Rs 36,000 crore Nashik Kumbh Mela expenditure, three-dam water planning and farmers relief amid Maharashtra's drought : राज्यात दुष्काळाने शेतकरी संकटात, नाशिक कुंभमेळ्यासाठी दोन-तीन धरणांचे पाणी देण्याच्या चर्चेवर शिंदेंनी उपस्थित केले प्रश्न; आर्थिक नियोजन आणि कर्जमाफीवरूनही सरकारला घेरले.
Shashikant Shinde
Shashikant ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 36 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असल्याची माहिती आपल्याकडे आहे. त्यासाठी दोन ते तीन धरणांमधून पाणी उपलब्ध करून देण्याची चर्चा आहे. एकीकडे दुष्काळी भागात शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसताना कुंभमेळ्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करणार, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अग्रीम मदतीवर, कर्जमाफीवर आणि नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चावर भाष्य केले.

नाशिक कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) खर्चाबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, "कुंभमेळ्यावर सरकारचा प्रचंड खर्च सुरू आहे. सरकारच्या तिजोरीत किती पैसा आहे? राज्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात आलेली अग्रीम मदत किती जणांपर्यंत पोहोचली, याची यादीही समोर आलेली नाही. कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जात आहे."

Shashikant Shinde
Shankarrao Gadakh on Vikhe Thorat Alliance : विखे-थोरातांच्या एकीने अनेकांच्या अडचणी वाढल्या! शंकरराव गडाख नेमकं कुणाला म्हणाले?

पुढे बोलताना त्यांनी कुंभमेळ्यासाठी 36 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा उल्लेख केला. "कुंभमेळ्यासाठी 36 हजार कोटींचा काहीतरी खर्च असल्याची माहिती माझ्याकडे आहे. पाण्याचे नियोजन दोन-तीन धरणांमधून केले जाणार असल्याची चर्चा आहे. मी याची माहिती घेणार आहे. अशा पद्धतीने नियोजन असेल, तर त्याचा दुष्काळी भागावर परिणाम होणार नाही का, याबाबत साशंकता आहे."

Shashikant Shinde
BJP Ramrao Wadkute Passes Away : भाजप खासदार रामराव वडकुते यांचे निधन; सात महिन्यापूर्वीच राज्यसभेवर झाली होती निवड

"शेतीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, मग अशा परिस्थितीत कुंभमेळ्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करणार? याचे सरकारने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. सरकारने खुलासा केला नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. याचा अभ्यास करून आम्ही आमची भूमिका मांडू," असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

पाच हजारांच्या मदतीवर कुटुंब कसे चालणार?

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य सरकारला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत शशिकांत शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, "शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कर्जमाफी केली तरी पुढील वर्षी उत्पन्न मिळेलच, याची खात्री नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत कशी पुरणार? केंद्र सरकारने अद्याप महाराष्ट्राला मदत दिलेली नाही. केंद्रीय पथक येऊन गेले, तरी मदत मिळालेली नाही." राज्यकर्त्यांचे दिल्लीत वजन कमी पडते की काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती, अन्नधान्याचे उत्पादन आणि भविष्यातील पाणीटंचाई यांचा ग्राउंड रिपोर्ट तयार करून सरकारने त्यानुसार नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले

राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे यांनी सरकारकडे निधीची कमतरता असल्याचा आरोप केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम मदत देण्यात अडचणी येत आहेत. कर्जमाफीची रक्कमही टप्प्याटप्प्याने दिली जात आहे. सरकारकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे याद्या तयार करून मदतीचे वितरण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारने इतर खात्यांमधील निधी वळवण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ तात्पुरती मदत न देता आगामी वर्षातील शेती उत्पादन, पाणी आणि अन्नधान्याच्या उपलब्धतेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकांकडून शेतकऱ्यांची वसुली सुरूच

दुष्काळी परिस्थितीतही काही बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला जात असल्याचा मुद्दाही शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "यासंदर्भात मला वारंवार फोन येत आहेत. मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि संबंधित सरकारी समितीने आदेश काढूनही शेतकऱ्यांना वसुलीसाठी त्रास दिला जात असेल, तर हे गंभीर आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला हा नियम लागू होतो, इतर कारणांसाठी घेतलेल्या कर्जाला लागू होत नाही, अशी उत्तरे दिली जात आहेत. शेतीच्या उत्पन्नातूनच कर्जाची परतफेड केली जाते. सरकारचे आदेश बँका मानत नसतील, तर सरकार फेल आहे."

बँक अधिकाऱ्यांना शिंदेंचा इशारा

बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर आम्ही पुढाकार घेऊ. आमच्या पद्धतीने बँक अधिकाऱ्यांना उत्तर देऊ, असा इशाराही शिंदे यांनी दिला. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चाचे आणि पाणीवाटपाच्या नियोजनाचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.