Vishwaguru Bharat. Sarkarnama
विदर्भ

Ayodhya Ram Mandir : देव ते देश आणि राम ते राष्ट्र; मंदिर निर्माणानंतर भारत विश्वगुरु हे टार्गेट

Sachin Deshpande

Narendra Modi : पाचशे वर्षांचा अथक संघर्ष, अनेक पिढ्यांचा त्याग आणि बलिदानानंतर सोमवारी (ता. 22) अयोध्येत रामजन्मभूमीस्थळी प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकार झाले. मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. आजचा हा ऐतिहासिक क्षण केवळ अयोध्येत साजरा केला गेला नाही, तर देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या हृदयात उत्साहाने साजरा झाला.

संपूर्ण देशात नवचैतन्य अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानिमित्त होते. जगभरात भारतीयांनी या क्षणाचा उत्सव साजरा केला. देशात प्रभाव टाकणारे सर्व संतमंडळी, उद्योजक, सिनेकलावंत, क्रीडापटू सोमवारी अयोध्येत होते. संपूर्ण जगात हा भव्यदिव्य, नेत्रदीपक सोहळ्याचे थेट प्रसारण प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवर, घरोघरी टीव्हीवर पाहिले. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात प्रत्येकामध्ये उत्साहाबरोबर आनंदही होता.

नव्या पिढीतील प्रत्येकासाठी हा क्षण स्वर्णिम होता. कारण गेल्या पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर सहिष्णु हिंदूंचे परमश्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले गेले. त्याचबरोबर प्रभूंची प्राणप्रतिष्ठापना मंदिरात झाली. या सोहळ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्बोधन करताना देव ते देश आणि राम ते राष्ट्र ही हाक सामान्य जनतेला दिली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील देशाला विश्वगुरु करण्याची गरज वर्तवली.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे वर्णन करताना आणि जगाला याचा काय संदेश दिला गेला, हे मोदींनी स्पष्ट केले. आज केवळ प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले गेले नाही तर, भारताची दृष्टी आणि दर्शन जगाला घडल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. राम मंदिर प्रत्येकासाठी कसे राष्ट्रचेतना करण्याचे सर्वोच्च स्थान आहे, याची माहिती मोदींनी दिली. राम भारतीयांची आस्था, आधार, विचारांचे प्रतीक आहेत. राम भारताचे विधान, चेतना, प्रतिष्ठा, प्रताप, प्रवाह, प्रभाव, नेकी आणि नीतीचे प्रतीक आहेत, असे मोदी म्हणाले. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना ही हजारो वर्षांसाठी आपल्यासोबत रामराज्याचा प्रभाव जपणारी असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कालचक्र बदलत आहे, असे मोदींनी वारंवार सांगितले. ते सांगताना त्यांनी देशातील प्रत्येकाला त्याची जबाबदारी जाणीव करून दिली. विशेषतः देशाच्या तरुणांकडून त्यांनी विशेष अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक तरुणाने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वतःला झोकून देण्याचे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोदींनी देशातील तरुणांना भारत निर्माणाची शपथ घेण्याची गरज वर्तविली. रामाचे विचार प्रत्येक व्यक्तीत असावे, हीच राष्ट्रनिर्माणाची शिडी असेल. चेतना आणि अंतःकरणातून कार्य करा. देव ते देश आणि राम ते राष्ट्र यांना जोडताना त्यांनी प्रभू श्रीरामाचे परमभक्त हनुमान यांच्या त्यागाची, समर्पणाची आठवण करून दिली.

देशासाठी भक्ती, सेवा आणि समर्पण भाव आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. त्यातूनच देश समर्थ, सशक्त आणि सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रनिर्माणात निराशेला स्थान नाही, असे सांगत एक छोटी खारुताई ही राम सेतू निर्माणात जशी महत्त्वाची होती, तसेच देश निर्माणात प्रत्येक सामान्य व्यक्ती हा महत्त्वाचा असल्याचा भाव आज मोदींनी शेवटच्या घटकांमध्ये जागृत केला. महाबली रावणासमोर आपला टिकाव लागणार नाही, हे माहीत असूनसुद्धा जटायूने दाखविलेली हिंमत प्रत्येकाला जोडावी लागेल, असे सांगितले. त्यातूनच रावणरुपी समस्यांचा नाश करता येईल, असे मोदी म्हणाले.

कर्तव्य करताना राष्ट्रनिर्माण हे परमोच्च स्थळी असावे, असे आवाहन त्यांनी केले. विकसित भारतासाठी मोदींनी धर्म आणि देश, राम आणि राष्ट्र यांचा सुरेख मिलाफ करून राष्ट्र धर्माचे कर्तव्य देशातील नागरिकांना सांगितले. पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर हा क्षण आल्याने प्रभू श्रीरामांची क्षमायाचना मोदींनी केली. देशातील प्रत्येक नागरिक त्याग आणि पुरुषार्थात कमी पडल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली. इतकी वर्षे आम्ही हे कार्य करू शकलो नाही, याची खंत आज मोदींनी बोलून दाखविली.

आमचे रामलल्ला आता टेंटमध्ये राहणार नाहीत, तर भव्य मंदिरात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संविधानाच्या पहिल्या पानात प्रभू श्रीराम आहे. तरी स्वातंत्र्यानंतर अनेक दशके राम मंदिर उभारण्यास लागले, यांची खंत मोदींनी वारंवार बोलून दाखविली. त्यात तितकीच सत्यता होती. न्यायपालिकेचे आभार मानत पंतप्रधानांनी न्यायाची लाज राखली गेली, असे महत्त्वाचे वाक्य कथन केले. न्यायानेच प्रभू श्रीरामांचे मंदिर स्थापन झाल्याचा आनंद व्यक्त केला. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही राम समाधान आहे, राम आमचे नाही राम सगळ्यांचे आहे, राम वर्तमान नाही राम अनंतकाल आहेत, अशी पुष्टी आज मोदींनी जोडली.

पाचशे वर्षांनंतर आनंदाचा दिवस आल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. राम मंदिर निर्माणानंतर पुढे काय हे सांगताना राष्ट्र निर्माणावर डॉ. भागवत यांनी भर दिला. त्यांनी सत्य, करुणा, शुचिता आणि तप यातून राष्ट्रनिर्माण कार्य होईल, असे स्पष्ट केले. सगळ्या घटकात राम आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. करुणा आणि सेवा त्याचबरोबर परोपकारात पुढाकार घ्यावा लागेल. प्रत्येकाला दुःख, पीडा दिसेल तिथे समाजाने सेवाकार्य करावे, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. अनुशासित नागरिक हीच देशभक्ती असल्याचे डॉ. भागवत म्हणाले. प्रत्येकाला सोबत घेत विकास करावा लागेल. मंदिर निर्माणानंतर नवे ‘टार्गेट’ डॉ. मोहन भागवत यांनी दिले ते टार्गेट भारत विश्वगुरु होण्याचे होते.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT