Nagpur News : भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात दररोज धक्कादायक माहिती नागपूर पोलिसांना मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सना खान हत्याप्रकरणात मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला होता. या दोन्हीमध्ये सुमारे दीडशेपेक्षा अधिक फोटो आणि चित्रफिती आढळल्या आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या या चित्रफिती राजकीय वर्तुळात खळबळ उडविणाऱ्या आहेत.
सना खान यांचा मारेकरी पप्पू ऊर्फ अमित शाहू याला पोलिसांनी कारागृहातून आपल्या कोठडीत घेतले होते. मोबाइल आणि लॅपटॉपचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता शाहू याची रवानगी पुन्हा नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. मानकापूर पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले. पोलिसांनी त्याच्या कोठडीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. परंतु न्यायालयाने पप्पूला कारागृहात पाठवले.
राजकीय दृष्टीने अत्यंत ‘हायप्रोफाइल’ असलेल्या या हत्येच्या तपासाबाबत नागपूर पोलिस गुप्तता बाळगत आहेत. पोलिस तपासातील कोणताही मुद्दा बाहेर लिक होणार नाही, याची काळजी तपास अधिकारी व त्यांचे सहकारी घेत आहेत. मोजक्याच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोबाइल आणि लॅपटॉपमधील फोटो, चित्रफिती तपासण्यात आल्या. मात्र हे फोटो आणि चित्रफिती नेमक्या कुणाच्या व कशाच्या होत्या, असे स्पष्ट करण्यात आले नाही. सना खान यांच्या ‘सेक्सटॉर्शन’च्या या चित्रफिती असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर शहरासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाना व उत्तर प्रदेशातील काही राजकीय मंडळी, व्यापाऱ्यांचे छायाचित्र आणि चित्रफिती असल्याची माहिती आहे. परंतु पोलिसांनी अद्याप कुणाचेही नाव उघड केलेले नाही किंवा रेकॉर्डवरही घेतलेले नाही.
सना खान यांच्या हत्या प्रकरणात राजकीय दबाव पोलिसांवर असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी छायाचित्र आणि चित्रफितींबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. अशातच पप्पू ऊर्फ अमित शाहूच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिसांनी मुख्य आरोपी अमित शाहू याच्या आईच्या घरावर छापा मारल्यानंतर पोलिसांच्या हाती नवे पुरावे लागले. सना यांचा मोबाइल आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला होता. पुरावे गोळा करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत पोलिसांनी घेतली.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये राहणाऱ्या अमित साहू याची भाजपने आयोजिलेल्या एका शिबिरात सना खान यांच्याशी ओळख झाली होती. सना खान यांची मोठमोठ्या नेत्यांशी ओळख असल्याचे अमितचे लक्षात आले. त्यामुळे भाजपकडून आमदारकीचे तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमित शाहूने सना खान यांच्याशी मैत्री केली.
सनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सनाशी विवाह करून अमितने राजकीय वलय निर्माण केले. त्यानंतर अमितने सना यांच्या काही अश्लील चित्रफिती तयार करून ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू केले. ऑगस्ट महिन्यात अमित शाहूने पैशांच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या केली.
त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह हिरन नदीत फेकून दिला. पोलिसांनी जवळपास तीन महिने शोधमोहीम राबवली, मात्र सना खान यांचा मृतदेह शेवटपर्यंत सापडलाच नाही. आरोपींनी सना खान यांचा मोबाइलदेखील नदीत फेकल्याचा दावा केला होता. पोलिसांना मोबाइलदेखील आढळला नव्हता.
अमित शाहूला पोलिसांनी दुसऱ्या एका गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला हिसका दाखविण्यात आला. बत्ती पडताच जबलपूरमध्ये राहणाऱ्या आईच्या घरी मोबाइल आणि लॅपटॉप असल्याची माहिती अमितने दिली.
पोलिसांची दिशाभूल करून कालांतराने मोबाइल व लॅपटॉपमधील फोटो व चित्रफितींच्या आधारे संबंधित राजकीय पदाधिकारी व व्यापाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचा कदाचित त्याचा कट होता. पोलिसांनी अमितच्या आईच्या घरी छापा टाकला. छाप्यात सना यांचा मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आला.
R..
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.