Prakash Ambedkar, Asaduddin Owaisi Sarkarnama
विदर्भ

Asaduddin Owaisi Vs Prakash Ambedkar : ओवेसींचा थेट 'बडे भाई'च्या मतदारसंघातूनच एल्गार...

Jagdish Pansare

Vidarbh Political News : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या 2019 मधील युतीला लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत ग्रहण लागले होते. विधानसभेला हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आलेले दलित-मुस्लिम वोट बँकेचे राजकारण औटघटकेचे ठरले.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचार सभांमधून आंबेडकर-ओवेसींनी मोठा धुरळा उडवून दिला. त्यातून पक्षाने महाराष्ट्रात थेट खातेच उघडले. इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) हे तेव्हाच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघातून नशीब आजमावणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघात वंचित-एमआयएमच्या सभांमध्ये असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रकाश आंबेडकर यांना अक्षरशः कडेवर उचलून घेत 'मेरे बडे भाई' असा उल्लेख केला होता. परंतु दोन मतदारसंघात उभे राहूनही जेव्हा आंबेडकरांचा पराभव झाला, तेव्हा या 'बडे भाई'ला, 'छोटे भाई'ने धोका दिल्याचा आरोप झाला. या पराभवानंतर आंबेडकरांनी एमआयएमच्या पतंगाची दोर कापली आणि स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढवली.

याचा फटका दोघांनाही बसला, वंचितचे तर खातेही उघडले नाही. लोकसभेला देशभरात 37 लाखांपेक्षा जास्त मतदान आणि वीस मतदारसंघात प्रभावी ठरलेल्या एमआयएम-वंचित युतीला विधानसभेत मात्र स्वतंत्र लढणे महागात पडले. भाजपचे मात्र ही युती तुटल्याने चांगभलं झाले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीला पुन्हा हे दोन्ही पक्ष वेगवेगळे समोरे जात आहेत.

आंबेडकरांची वंचित आघाडी (Vanchit) महाविकास आघाडीचा भाग बनली आहे, तर ओवेसींच्या एमआयएमला अजूनही नवा साथीदार मिळालेला नाही. त्यामुळे वंचितबद्दल असलेला राग व्यक्त करण्यासाठी ओवेसी यांनी थेट अकोल्यातूनच 'बडे भाई' प्रकाश आंबेडकरांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. लोकसभा निवडणुकीची पहिली एमआयएमची सभा सध्या अकोल्यात सुरू आहे.

या सभेतून आता ओवेसी 'बडे भाई' आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) समाचार कसा घेतात? एमआयएमसोबत लोकसभेला केलेली युती विधानसभेत का तोडली? यामागची कारणे काय सांगतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी विदर्भातील पहिली सभा म्हणून अकोल्याची निवड केल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र ज्या ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना 'बडे भाई' म्हणून उचलून घेतले होते. आता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात आपटी देण्याची तयारी सुरू केल्याचे या सभेवरून स्पष्ट होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT