Nana Patole, Ashish Deshmukh  Sarkarnama
विदर्भ

Nagpur BJP : प्रदेश काँग्रेसमधील दोन कार्याध्यक्ष सोडणार ‘पंजा’ची साथ

Ashish Deshmukh : माजी आमदाराने दिले पक्षांतराचे संकेत; मोदी, फडणवीस, बावनकुळेंवर विश्वास

Atul Mehere

BJP on Congress : आगामी काही दिवसात महाराष्ट्रातील काँग्रेस पूर्णपणे विखुरलेली दिसेल. महाराष्ट्रातील काँग्रेस नेस्तनाबूत झाली तरी चालेल, परंतु प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावरील प्रेम काही कमी करायचे नाही, असा हेका राहुल गांधी यांचा आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते तथा माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला.

‘सरकारनामा’शी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले की, प्रदेश काँग्रेसमधील दोन कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री भाजपच्या सतत संपर्कात आहेत. लवकरच ते ‘पंजा’ची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करतील.

देशाचे आणि काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी करूच शकत नाही. त्यांची ती ताकद नाही. अशात महाराष्ट्रातही काँग्रेस बिथरली आहे. अनेकांची आजही भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे. भाजपमध्ये कितीही नेत्यांनी प्रवेश केला, तरी पक्षातील संतुलन बिघडणार नाही. जुन्या निष्ठावंत नेत्यांना जपत नव्याने येणाऱ्यांनाही न्याय देण्याचे काम भाजप निश्चित करेल, असा विश्वासही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

देशपातळीवर ज्योतिरादित्य शिंदे, जितेंद्र प्रसाद, रणजित प्रताप नारायण सिंह, अनिल अँटनी, हार्दिक पटेल आदी अनेकांनी काँग्रेस केव्हाच सोडली आहे. काँग्रेसचे नेतृत्व असलेले राहुल गांधी देशातील युवा पिढीला कोणतीही नवीन दिशा दाखवू शकलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक तरुण चेहरे आता पक्ष सोडून गेले आहेत. एकविसाव्या शतकात भारताला विश्वगुरू करायचे असेल, तर काँग्रेस नव्हे नरेंद्र मोदीच हे करू शकतात असे सर्वांच्या लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर एकवाक्यता नाही. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावरच नव्हे तर महाराष्ट्रातही काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर ‘आऊटगोइंग’ बघायला मिळणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. काही दिवसांमध्येच काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या सर्व काही स्पष्ट करेल. त्यामुळे अधिक भाष्य करण्याची गरज भासणार नाही. भविष्यात भाजपची स्थिती राज्यात व केंद्रात आणखी मजबूत झालेली बघायला मिळणार आहे, असा ठाम विश्वासही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास ठेवत अनेक जण भाजपच्या उंबरठ्यावर उभे आहे. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यात येईल. याचा चांगला फायदा भाजप पक्षसंघटनेला आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत होईल, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT