Bribe Case : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने (CBI) लाचखोरीच्या आरोपाखाली केंद्र सरकारच्या ‘पेसो’ (Petroleum and Safety Organization) मधील दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी दोन जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सीबीआयने अटक केलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतली. त्यात तपास पथकांना 2 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हाती लागला आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे ‘पेसो’ प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
सीबीआयने नागपूर शहरातील सेमिनरी हिल्स येथील ‘पेसो’ कार्यालयाजवळ असलेल्या एका टायपिंग सेंटरवर सापळा रचला. त्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. राजस्थानच्या चित्तोगडमध्ये असलेल्या स्फोटक कंपनीत तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरची निर्मिती क्षमता वाढवून देण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयच्या पथकाने नागपूर शहरातील काही ठिकाणांवर छापे घातले.
छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम आढळल्याने लक्ष्मीनगर येथील प्रियदर्शन दिनकर देशपांडे आणि मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकलचे संचालक देवीसिंग कछवाह यांनाही अटक करण्यात आली. प्रियदर्शन देशपांडे हे ‘पेसो’मधील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. त्यांच्या लक्ष्मीनगर येथील घरातून सीबीआयच्या पथकांनी 1 कोटी 25 लाख रुपये जप्त केले. राजस्थान येथील रहिवासी असलेले देवीसिंग कछवाह यांच्याकडूनही 10 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बुधवारी (ता. 3) डांबर खरेदीमधील अंकेक्षण अहवालात असलेल्या त्रुट्यांमुळे होणारी संभाव्य वसुली टाळण्यासाठी ग्रामसेवकाकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारणे साकोली पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले होते. संबंधित ग्रामसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपल्याच साहेबांच्या ‘डिमांड’ची तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा घालत लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहाथ सापळ्यात पकडले. खिलेंद्र देवरलाल टेंभरे (वय 52) असे विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. भंडारा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.
भंडारा जिल्ह्यातील हा घटनाक्रम ताजा असतानाच नागपूर शहरात सीबीआयच्या पथकांनी घातलेल्या छाप्यांमध्ये लाचखोरीचे मोठे घबाड उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भंडारा आणि नागपूर येथील दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यातून आणखी काही मुद्दे स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.