Ashish Deshmukh Reply to Congress Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh News : निलंबन कारवाईला देशमुखांचं प्रत्युत्तर; पृथ्वीराज चव्हाणांना लिहिलं पत्र; काय म्हणाले?

Ashish Deshmukh Reply to Congress : मला नोटीस बजावून, प्रदेश कॉंग्रेसने आपल्याच लोकशाहीवादी परंपरेचा अपमान केला...

Deepak Kulkarni

Nagpur News : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणं आशिष देशमुख यांना चांगलंच भोवलं असून अखेर त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिस्तपालन समितीने देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले आहे.

यानंतर आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे शिस्तपालन समितीचे पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी निलंबनाच्या कारवाईवर कठोर शब्दांत भाष्य केलं आहे.

आशिष देशमुख यांनी मागील दिवसांत नाना पटोले यांच्यावर गंभीर आऱोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.मात्र, काँग्रेसपक्षाच्या शिस्तपालन समितीनं अखेर देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांना तीन दिवसांत कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे. तोपर्यंत देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. आता निलंबनाच्या कारवाईनंतर थेट पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहित निलंबन कारवाईला प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी आशिष देशमुख(Ashish Deshmukh) यांनी मी पक्ष आणि कार्यकर्त्यांसह एकूणच ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उठवत असल्याने मला लक्ष्य करण्यासाठी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे असा आरोप केला आहे. तसेच माझ्या विरोधातील मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे आणि नेत्यांच्या कार्यशैलीबाबत प्रश्न विचारण्याचे माझे धाडस हे त्याचे कारण आहे. मला नोटीस बजावून, प्रदेश कॉंग्रेसने आपल्याच लोकशाहीवादी परंपरेचा अपमान केला आहे. पण मी निश्चिंत आणि निश्चयी आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं असा इशाराही दिला आहे.

कोणतेही सबळ कारण नसताना मला कारणे दाखवा नोटीस बजावली ही दुर्दैवाची बाब आहे. मला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये दोन मुद्दे आहेत. पहिली गोष्ट राहुल गांधी यांनी देशभरातील ओबीसी समाजाची माफी मागावी असे मी सुचवले होते. योग्य निष्कर्ष काढण्यासाठी हा विषय संदर्भासह समजून घेणे आवश्यक आहे.

राहुलजींचे 'मोदी' आडनाव असलेल्या व्यक्तींचा संदर्भ देणारे विधान, त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलेली 2 वर्षांची शिक्षा आणि त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात येणे हा त्याचा मूळ संदर्भ आहे असंही देशमुख म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांच्या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, जणू त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आपण या अर्थाशी सहमत आहोत की नाही, हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. माझी सूचना पक्षाच्या हिताची होती. मला एवढंच म्हणायचं होतं की, ओबीसी समाजात काँग्रेसच्या विरोधात काही भावना असेल तर माफी मागून प्रकरण संपवलं पाहिजे.

या अगोदरही गांधीची माफी...

या अगोदरही 'चौकीदार चोर हैं' प्रकरणी मा. राहुलजी यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती. तसेच राफेल प्रकरणी त्यांनी मे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती असल्याचा निर्वाळाही देशमुख यांनी पत्रात दिला आहे.

कारणे दाखवा नोटीस बजावण्यापेक्षा...

एमपीसीसी अध्यक्षांशी संबंधित 'खोका' या माझ्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तथापि , त्याचा अर्थ काढण्याचे काम मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांवर सोडतो. त्यांनी माझ्या सुचनेचा ज्याप्रमाणे अर्थ काढला, तसा ते या मुद्याचाही काढू शकतात. काँग्रेसने ओबीसी समाजाची उपेक्षा केली तर हा पक्ष अधिक अडचणीत येईल, या वास्तवाचा मी पुनरुच्चार करतो.

कारणे दाखवा नोटीस बजावण्यापेक्षा मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला देतो की, त्यांनी आपले मन, शब्द आणि कृती ओबीसींच्या हितासाठी वापरावी. ज्यामुळे आपोआप पक्षाचे हित होईल असंही देशमुख म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT