Eknath Shinde-Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवारांच्या आरोपांमधली हवाच काढली; म्हणाले," ज्यांना मॅडमची परवानगी घेतल्याशिवाय..."

Deepak Kulkarni

Nagpur News : नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला.पण या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनापूर्वीच सरकारवर आरोपांची तोफ डागली. याच टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत वडेट्टीवारांच्या टीकेतली हवाच काढली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षाच्या या तीनही नेत्यांनी विरोधकांची पिसे काढली. शिंदे म्हणाले, तुम्ही विकासाच्या बाता करता आहात,पण लोकं सुज्ञ आहेत. सत्ता काबीज करण्याचं त्यांचे स्वप्नं तीन राज्यांच्या निवडणुकांनी साफ केली आहेत. त्यांच्या सत्ता काबीज करण्याचे दोर पूर्णपणे कापले गेले आहे. त्यामुळे ते कठपुतली आणि इतर गोष्टी बोलत आहेत. आमच्या दोऱ्या लोकांच्या हातात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असं ते म्हणाले.

याचवेळी विरोधक आम्हाला म्हणाले, स्वाभिमान हरवलं आहे,दिल्लीत जातात,कठपुतली आहे,आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही,त्यांनी आमच्यावर आरोप करायचे? स्वाभिमानाची भाषा करायची? असा खोचक सवाल करत विजय वडेट्टीवारांच्या (Vijay Wadettiwar) आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिंदे म्हणाले, अरे आम्ही दिल्लीला जातो ना,निधी आणतो.केंद्र सरकारने आम्हाला पैसे दिले आहेत,ते मागितल्याशिवाय मिळत नाही ना? त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. गेल्या अडीच वर्षांत याच अहंकारामुळे केंद्र सरकारने पैसे दिले नाही का? तुम्ही मागायला पाहिजे ना.आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं,अनेक प्रकल्प बंद पाडले,स्थगित केले असा आरोपही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. पण आता आमचं सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून मेट्रो, आरेपासून अनेक प्रकल्प सुरु करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणावर शिंदे म्हणाले...

राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्द्यावरुन विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच शिंदेंनी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केले. शिंदे म्हणाले,आम्ही आरक्षणाबाबत सुरुवातीपासून भूमिका घेतली आहे.

तसेच मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आणि इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, कुणाचंही आरक्षण कमी केले जाणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.यावेळी त्यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्ही सांगितलं आहे.या सरकारची भूमिका मराठा समाजारा आरक्षण देण्याची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

'पुढच्या वर्षी विरोधकांसाठी चहापान नाही तर...'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला. म्हणाले,विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, यासाठी हे अधिवेशन असतं. मात्र, विरोधी पक्षांच्या पत्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात पत्रात साधा शब्द नाही, त्यांना त्याचा विसर पडला आहे", असा टोला फडणवीसांनी लगावला.

विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला. पण हा चहापानचा कार्यक्रम चर्चेसाठी असतो. मात्र, पुढच्या वर्षी विरोधकांसाठी सुपारी पान ठेवावे लागेल, अशी खोचक टीका करत त्यांनी विरोधकांना फटकारलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT