Police strengthen security near Ramgiri Bungalow as Bacchu Kadu supporters gather in Nagpur for a major protest. Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu protest : बच्चू कडू आक्रमक, सरकारी यंत्रणा लागली कामाला; ‘रामगिरी’वर सुरक्षा वाढविली...  

Bacchu Kadu’s Aggressive Stand in Nagpur : आंदोलनामुळे बेलोरा ते नागपूर मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक प्रभावित झाली आहे. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेण्यास नकार दिला आहे.

Rajesh Charpe

Government Machinery in Action to Control Protest : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला आजवर आठवेळा स्मरणपत्र देण्यात आले. त्याची कोणतीच दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे आता कर्जमाफीचा शासन आदेश निघाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी सरकारी आदेशाशिवाय हटणार नाही, असा इशारा देऊन महामार्गावरच ठाण मांडले असल्याने महायुती सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तिथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हे बघता कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन पुकारले असून अमरावती जिल्ह्यातून आंदोलनकर्ते काल सायंकाळी साडेसहा वाजता नागपूरच्या वेशीवर धडकले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (क्रांतीकारी) अध्यक्ष रवीकांत तुपकर, अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. या मोर्चामध्ये 500 पेक्षा अधिक ट्रॅक्‍टर त्यांच्यासोबत आहेत.

आंदोलनामुळे बेलोरा ते नागपूर मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक प्रभावित झाली आहे. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेण्यास नकार दिला आहे. आम्ही रेल्वे बंद पाडू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, शासनाने विधानसभा निवडणूकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन दिले. परंतू त्याची पूर्तता करण्यात आली नाही. शासनाने शेतकऱ्यांना गृहित धरल्याने शेतीक्षेत्रासमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. अतिवृष्टीच्या भरपाईत देखील दुजाभाव करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करण्यात आला होता.

उत्पन्न तर नाही परंतू खत, डिझेल, पेट्रोल दरात वाढीच्या माध्यमातून त्यांचा उत्पादकता खर्च मात्र दुप्पट, तिप्पट करण्यात आला. मजूरी खर्चातही मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळेच शेती कामांचा समावेश रोजगार हमी योजनेत व्हावा, अशी मागणी आहे. त्याची देखील पूर्तता गेल्या अनेक वर्षात करण्यात आली नाही, असे कडू यांनी सांगितले.

दिव्यांगाचे मानधन वाढीचा मुद्दाही प्रलंबीत आहे. त्यासोबतच मेंढपाळही अनेक सोयी सुविधांपासून वंचीत आहे. अशा सर्व आश्‍वासनांची पूर्तता शासनाने तत्काळ करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. शक्‍तीपीठसाठीचे सक्‍तीचे भुसंपादन रद्द करुन त्याऐवजी हा पैसा शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ वापरावा, अशी मागणीही कडू यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT