Ravi Rana-Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Ravi Rana Vs Bacchu Kadu : रवी राणांच्या दाव्यावर बच्चू कडूंची मिश्किल टीका; ‘भाजपला मंत्रिपदापेक्षा मोठे...’

Vidharbha Political News : विधानसभेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला, तर भाजपमधून प्रचंड विरोध असतानाही रवी राणा निवडून आले. त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केली होती. त्याचाही फरकही त्यांना पडला नव्हता.

Rajesh Charpe

Nagpur, 13 January : अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू या दोन नेत्यांमधील वैर सर्वश्रुत आहे. ते उघडपणे भांडत असतात आणि आरोप-प्रत्यारोपही करीत असतात. एकमेकांवर टीकाटिपणी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यातच रवी राणा (Ravi Rana) यांनी मंत्रिमंडळाच्या यादीत आपले नाव होते, असा दावा केला होता. त्यावर बच्चू कडू यांनी यादीत नाव असणे आणि प्रत्यक्ष मंत्रिमंडळात असणे यातच मोठा फरक असल्याचे सांगितले. यापुढे जाऊन त्यांनी राणा यांना कदाचित मंत्र्यांपेक्षाही मोठे पद भाजपला द्यायचे असेल, असाही टोलाही लगावला.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उघडपणे विरोध दर्शवला होता. त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारही उभा केला होता. महायुतीत असलो तरी राणा यांचे काम करणार नाही, असेही त्यांनी महायुतीच्या नेत्यांसह सर्वांना ठणकावून सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला, तर महायुतीच्या नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मात्र बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि राणा दांपत्य यांच्यातील संघर्ष वाढला होता. विधानसभा निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणात दिसून आला. विधानसभेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला, तर भाजपमधून प्रचंड विरोध असतानाही रवी राणा निवडून आले. त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केली होती. त्याचाही फरकही त्यांना पडला नव्हता.

भाजपचा बंडखोर विरोधात असूनही रवी राणा यांनी महायुतीला समर्थन दिले होते. त्यामुळे रवी राणा यांना मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंत रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे नाव पुकारण्यात आलेच नाही. त्यावर राणा यांनी प्रथमच भाष्य केले. मंत्रिमंडाळाच्या यादीत माझे नाव होते. मात्र, नंतर काय झाले, हे मला माहिती नाही, असे ते म्हणाले.

महविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ते महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले होते. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे सर्वांनाच वाटत होते. अधून-मधून ते सरकारवर आरोप करून आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेत होते.

विधानसभेच्या निवणुकीत त्यांनी महायुतीसोबत राहण्यापेक्षा तिसरी आघाडी निर्माण केली होती. अनेक ठिकाणी त्यांनी तिसऱ्या आघाडीचे उमेदवारही उभे केले होते. मात्र, तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करणे बच्चू कडू यांच्या चांगलेच अंगलट आले. त्यांच्यासह तिसऱ्या आघाडीचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT