Madhya Pradesh Assembly Election 2023 Betting. Google
विदर्भ

Bhandara : मध्य प्रदेशात कोण जिंकणार? चक्क स्टॅम्प पेपरवर लागली पैज

अभिजीत घोरमारे

Madhya Pradesh Results : मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान पार पडले. रविवारी (ता. 3) मतमोजणी होणार आहे. निकालानंतर ‘कमल’ की कमलनाथ या फैसला होणार आहे. मध्य प्रदेशातील या निवडणुकीच्या अनुषंगानं भंडारा जिल्ह्यातील सिमावर्ती गावांमध्ये पैज व सट्टेबाजीला उधाण आलय.

मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकणार की भाजप याची पैजही लागली आहे. एका गावातील काही जणांनी तर चक्क सरकारी स्टॅम्प पेपरवर एक लाख रूपयांची पैज लावली आहे. पैज लावण्यात आलेल्या स्टॅम्प पेपरचा फोटो भंडारा जिल्ह्यात चांगलाय व्हायरल झालाय. (Betting On Stamp Paper For Madhya Pradesh Assembly Elections 2023 In Villages On Border At Bhandara District Of Maharashtra)

भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) ही पूर्वतयारी मानली जात आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी इतिहासातील सर्वाधिक मतदान झालं. गेल्या 66 वर्षांतील मतदानाचे सर्व विक्रम मोडत 76.22 टक्के मतदान राज्यात झालय. त्यामुळे मध्य प्रदेशाच्या जनतेने मतदानाला अधिक गंभीरतेनं घेतल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस व भाजप यांच्या जय-पराजयावर अनेकांनी शर्यत लावली आहे. अशात नीरज मालवीय आणि धनीराम भलावी यांची चक्क स्टॅम्प पेपरवर एक लाख रुपयांची लावलेली पैज चर्चेत आली आहे. मध्य प्रदेशाच्या पडरभट्टा निवासी धनीराम भलावी यांनी काँग्रेसचा विजय होईल असं म्हटलय. तर हर्रई निवासी नीरज मालवीय यांनी भाजप जिंकेल म्हणुन पैज लावली आहे. दोघांनीही या पैज सरकारी कागदपत्रांवर आणली आहे. पैजेतील एक लाख रुपयांचा चेक दोघांनही एकाजवळ जमा ठेवला आहे. स्टॅम्प पेपरवर साक्षीदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैज जिंकणारा व्यक्ती संबंधिताकडून एक लाख रुपयांचा चेक घेऊन तो ‘कॅश’ करणार आहे. पैजचा निकाल मतदान मोजणीनंतर 3 डिसेंबरला लागणार आहे. त्यामुळं पैज लावणाऱ्या व साक्षीदारांनी आता याच दिवशी भेटण्याचा निर्णय घेतलाय. सध्या मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या गावागावांमध्ये अशा पैज लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर सट्टाबाजारही सध्या तेजीत आहे. ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष जाहीर झाल्यापासून तर सट्टा बाजारात मोठी उलाढाल सुरू झालीय.

‘एक्झिट पोल’ प्रमाणे सट्टा बाजारांनंही पाच राज्यांच्या निकालाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या राज्यांत काँग्रेस बाजी मारेल असं सांगण्यात येत आहे. देशभरातून पाच राज्यांच्या निवडणुकीवर सुरुवातीला 40 हजार कोटींचा सट्टा लागला होता. आता हा आकडा 65 हजार कोटींच्या घरात गेल्याचं सांगण्यात येत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT