Anil Dhanorkar joins BJP with 10 former corporators, changing Bhadravati Municipal political equations long dominated by Shiv Sena UBT. Sarkarnama
विदर्भ

Congress Vs BJP : महाराष्ट्रात आणखी एक राजकीय घराणे फुटले; विद्यमान काँग्रेस खासदारांच्या घराला भाजपचा सुरुंग

Maharashtra Political News: भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी 10 माजी नगरसेवकांसह भाजप प्रवेश करणार. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे भद्रावती पालिकेवरील वर्चस्व डळमळीत होणार आहे.

Hrishikesh Nalagune

चंद्रपूर : भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर आज (गुरुवार) भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत 10 माजी नगरसेवकही कमळ हाती घेतील, असे सांगितले जात आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने भद्रावती नगरपालिकेचे राजकीय समीकरण बदलणार आहे. आजवर भद्रावती पालिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. यामुळे धानोरकर कुटुंबात आता अधिकृत राजकीय फूट पडणार आहे.

अनिल धानोरकर 2008 ते 2013 या कालावधीत भद्रावती नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. वरोरा-भद्रावती मतदारसंघातून शिवसेनेकडून बाळू धानोरकर विधानसभेत विजयी झाले होते. त्यानंतर भद्रावती पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली. 2014 ते 2024 या कालावधीत अनिल धानोरकरांनी नगराध्यक्षपद भूषवले. 2016 ते 2019 या कालावधीत ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही होते.

2019 मध्ये बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी अनिल धानोरकर त्यांच्या प्रचारात सक्रिय होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वरोरा-भद्रावती मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रतिभा धानोरकर रिंगणात होत्या. त्या वेळीही अनिल धानोरकर काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होते. मात्र, बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले.

त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यावेळीही अनिल धानोरकर त्यांच्या सोबत होते. प्रतिभा धानोरकर प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे वरोरा-भद्रावती विधानसभेत काँग्रेसकडून अनिल धानोरकर उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली.

परंतु, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपले बंधू प्रवीण काकडे यांना पाठिंबा देण्यास सुरवात केली. यामुळे धानोरकर कुटुंबात वितुष्ट आले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि संबंध ताणले गेले. दरम्यान, विधानसभेसाठी काँग्रेसकडून प्रवीण काकडे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली. अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली. मात्र, काकडे आणि धानोरकर दोघांनाही मतदारांनी नाकारले. त्यानंतरही धानोरकर कुटुंब एकत्र आले नाही.

राजकीय पुनर्वसनाच्या संधी शोधत असलेल्या अनिल धानोरकर यांनी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्याशी हातमिळवणी केली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे आश्वासन त्यांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला. गुरुवारी ते मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रशांत सदाशिव झाडे, प्रमोद परसराम नागोसे, शुभांगीताई उमरे, नीलेश देवईकर, रेखाताई राजूरकर, लिलाताई ढुंमणे, प्रतिभाताई निमकर, शारदाताई ठवसे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संदीप कुमरे आणि व्यापारी असोसिएशनचे प्रवीण महाजन हेही भाजपात प्रवेश करतील.

समीकरण बदलणार :

भद्रावती नगरपालिकेवर आजवर भाजपची सत्ता आली नाही. 2008 मध्ये बाळू धानोरकर यांनी भाजपशी युती तोडली. तेव्हापासून भाजप या पालिकेवर सत्ता मिळवण्यात अपयशी ठरले आहे. 2008 ते 2024 या कालावधीत धानोरकर कुटुंबाचे वर्चस्व या पालिकेवर राहिले आहे. शिवसेनेचे नगरसेवक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय दिसले. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. 31 सदस्यीय या नगरपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 19, भारिपचे 4, भाजपचे 4, काँग्रेसचे 2 आणि अपक्ष 1 नगरसेवक आहे.

सध्या पालिकेवर प्रशासक आहे. यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आठ नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. उर्वरित धानोरकर यांच्यासोबत भाजपात प्रवेश करतील. यापूर्वी भद्रावतीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. यामुळे भाजपाला बळ मिळाले आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु भाजपने आता त्याला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT