Sharad Pawar, Bhagyashree Ataram, Ajit Pawar, dhrmraobaba ataram  Srakarnama
विदर्भ

Bhagyshri Ataram News : भाग्यश्री आत्राम यांचं ठरलं! वडिलांविरोधात मुलगी मैदानात, 'या' तारखेला करणार शरद पवारांच्या 'NCP'त प्रवेश

Rajesh Charpe

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. त्या 12 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. हा बाबा आत्राम यांना मोठा धक्का मानला जात आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी जाणार असल्याची जोरदार चर्चा महिनाभरापासून सुरू होती. या चर्चेला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) शिव स्वराज्य यात्रा 12 सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्यात येणार असून याच कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम पक्ष प्रवेश करणार आहेत. (Bhagyashree Ataram News)

अजित पवार यांच्य न्याय सन्मान यात्रेतही भाग्यश्री आत्राम यांचा उल्लेख झाला होता. अजित पवार यांनी कोणाचेही घर फोडू नये, असे जाहीर आवाहन केले होते. यानंतर बाबा आत्राम यांनी मुलीशी आणि जावयाची आपला संबंध नसल्याचे सांगितले. तिला फेकून द्या, असेही आवाहन केले होते.

आत्राम यांची मुलगी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार ही चर्चा होती. ती आता खरी ठरली आहे. भाग्यश्री आत्राम या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीतच त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र त्यांनी वडिलांच्या इच्छेला मान देऊन पाच वर्षे प्रतीक्षा करण्याचे ठरवले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यानंतर बाबा आत्राम यांना मंत्री करण्यात आले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढायची आहे. यावरून वडील व मुलीमध्ये वाद सुरू झाला होता. मुलीच्या बंडखोरीचा बाबा आत्राम यांना आधीच अंदाज आला होता. हे बघून त्यांनी गडचिरोली लोकसभा मतदासंघातून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली होती. सर्व काही ठरले होते. प्रसंगी त्यांनी भाजपचा भगवा हाती घेण्याचीसुद्धा तयारी दर्शवली होती. मात्र केंद्रातून सूत्र हलले.

भाजपच्या सर्व्हेत पराभव दिसत असतानाही अशोक नेते यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे बाबा आत्राम यांचे सर्व नियोजन फिस्कटले आणि त्यांच्यासमोर मुलींच्या बंडाचा सामना करण्याची वेळ आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात आत्राम विरुद्ध आत्राम असाच सामना अनेक वर्षांपासून सुरू आहे. २०१४च्या विधानसभेच्या निवडणुकीत बाबा आत्राम यांना त्यांचे पुतणे अंबरीश राजे आत्राम यांनी पराभवाचा धक्का दिला होता. ते भाजपचे आमदार होते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते काही काळ राज्यमंत्री होते. मात्र त्यांना आपले राजकीय अस्तित्व टिकवता आले नाही. त्यानंतरच्या निवडणुकीत बाबा आत्राम यांनी परभवाचा वचपा काढला. आता त्यांना सख्या मुलीच्या विरोधात लढावे लागू शकते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्राम पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचे विधानसभेचे तिकीटही पक्के मानले जात आहे. त्यामुळे बाबा आत्राम आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT