Sanjay Kumbhankar, Bala Kashikar and Prashant Balbudhe. Sarkarnama
विदर्भ

Bhandara BJP News : प्रतीक्षा जिल्हाध्यक्षांची; तिघांच्या नावाची चर्चा, पण ‘या’ माजी राज्यमंत्र्यांची भूमिका ठरणार महत्वाची!

सरकारनामा ब्यूरो

BJP Bhandara District Chief News : गेल्या काही दिवसांपासून प्रदेश भाजपची लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आता सर्वांच्या नजरा नव्याने नियुक्ती होणाऱ्या जिल्हाध्यक्षांकडे लागल्या आहेत. (All eyes are on the newly appointed District President)

गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच ही निवड होणार होती. परंतु कर्नाटकच्या निकालामुळे या नियुक्त्या लांबल्या. दरम्यान, भंडारा जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले प्रदीप पडोळे यांची तुमसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती तर विद्यमान जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे यांची लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाल्याने आता या दोघांचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे.

उर्वरित तीन इच्छुकांमधून जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात संजय कुंभलकर, माजी आमदार राजेश (बाळा) काशीवार व प्रकाश बाळबुद्धे यांच्या नावाची चर्चा आहे. जातीय समीकरणाचा विचार केला घेतला तर संजय कुंभलकर यांची वर्णी जिल्हाध्यक्ष पदी लागू शकते. यातही कुंभलकर हे माजी मंत्री परिणय फुके यांच्या विश्‍वासातील असल्यामुळे त्यांचीच जिल्हाध्यक्ष पदी निवड होण्याची शक्यता भाजपच्या गोटातून वर्तविली जात आहे.

सुरुवातीला ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती त्यांची नावे मागे पडली आहेत. गेल्या महिन्यात भाजप श्रेष्ठींनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या समर्थकांबरोबर चर्चा केली. तसा अहवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना देण्यात आला आहे. त्यानुसार १५ मेपर्यंत जिल्हाध्यक्षपदाच्या जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर भाजपने पक्षांतर्गत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी लांबणीवर पडल्या.

३० जूनपर्यंत या नियुक्त्या होतील, अशी अपेक्षा होती. पण अद्यापही याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र त्यांपैकी दोघांची अन्य ठिकाणी वर्णी लावण्यात आल्याने तर इतरांचे पत्ते कट झाले. आता या तिघांपैकी कुणाला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळणार, याबाबत शंकाकुशंका व्यक्त होत आहेत. या निवडीत माजी राज्यमंत्री परिणय फुके यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

'एक व्यक्ती एक पद' फॉर्म्युला..

भाजपमध्ये देखील आता 'एक व्यक्ती एक पद’, हा फॉर्म्युला राबविणार जाणार आहे. त्या दृष्टीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील बैठकीत तसेच जाहीर केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुकांची अडचण होणार आहे. त्यांच्या कुटुंबातीलही इतर कुणाला अन्य पदे मिळणार नाहीत.

विद्यमान जिल्हाध्यक्षांच्या कामकाजाबाबत नाराजी..

विद्यमान जिल्हाध्यक्षांवर कार्यकर्त्यांसह नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुकानिहाय दौरे नाहीत. संघटनेच्या बैठका नाहीत. याबाबत कार्यकर्त्यांनी थेट वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, पद जरी माझ्याकडे असले तरी रिमोट कंट्रोल वरिष्ठांकडे असल्याची सल विद्यमान जिल्हाध्यक्षांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे.

पद्धतशीर कापला इच्छुकांचा पत्ता..

भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक नावे आगामी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांचा ‘पद्धतशीर’ पत्ता कापला, अशी चर्चा भाजपच्या एका गटाच्या वर्तुळात सुरू आहे. तर क्षेत्रात पक्ष संघटन व जनसंपर्क वाढविण्यासाठी त्यांना ही जबाबदारी दिली गेली व तेच प्रबळ दावेदार असल्याची चर्चा भाजपच्या दुसऱ्या गटाच्या वर्तुळात सुरू आहे.

भाजपने लोकसभा-विधानसभा मतदारसंघ प्रमुखांची यादी जाहीर केली. त्यानुसार माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे पुत्र विजय शिवणकर यांना भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख करण्यात आले आहे. ते याच मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर साकोली विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून परिणय फुके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपने परिणय फुके यांना साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेसचे नाना पटोले यांनी फुकेंचा पराभव केला होता. फुके हे भंडारा, गोंदिया येथे अत्यंत सक्रिय आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे तिकीट मिळणार, याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आता त्यांच्यावर साकोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्याने त्यांचा पत्ता कट होणार का, अशीही एक चर्चा आहे.

साकोली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिल्याने तिकीट जवळपास पक्के झाले असल्याचे फुके (Dr. Parinay Fuke) समर्थकांना वाटत आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे (BJP) तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी पडोळे यांना निवडणूक (Election) प्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे संकेत तर श्रेष्ठींनी दिले नाहीत ना, अशीही एक चर्चा आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT