Devendra Bhondekar Sarkarnama
विदर्भ

Bhandara District News : बॅनरबाजीचा नवा ट्रेंड, पटोलेंनंतर आता शिंदे गटाचा 'हा' नेता भावी पालकमंत्री !

Future Chief Minister : ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सरकारनामा ब्यूरो

Narendra Bhondekar's birthday was celebrated on Monday : वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून राजकीय पक्षांकडून बॅनरबाजीचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लावलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (Shiv Sena has now taken a further leap in the banner competition)

भंडारा-पवनी विधानसभेचे शिंदे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा सोमवारी (ता. २६) वाढदिवस साजरा करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर भंडाऱ्यात अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात झळकत आहेत. त्या बॅनरवर भोंडेकरांना भावी पालकमंत्री म्हणून संबोधित करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून राज्यातील विविध भागांत राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा, या उद्देशाने बॅनर लावले होते. नुकतेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांना भावी मुख्यमंत्री संबोधित करून शुभेच्छा दिल्या.

बॅनरबाजीच्या स्पर्धेत आता शिवसेनेने पुढची उडी घेतली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिवसेनेच्या शिंदे गटाने आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वाढदिवशी भाजप खासदारांच्या शहरात थेट जिल्ह्याचे ‘भावी पालकमंत्री’ अशी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना पुन्हा चर्चेत आली आहे.

भंडारा शहरात भुयारी गटारी प्रकल्प, नवीन नळ पाइपलाइन योजना, महिला सामान्य रुग्णालय, सांस्कृतिक भवन, वैनगंगा पर्यटन स्थळ, खांब तलावाचे सौदर्यीकरण तसेच ५१ फूट भगवान श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचे भूमिपूजन अशी एक नाही बरीच कामे होताना दिसत आहेत. याकडे मुख्यमंत्र्याचे विशेष लक्ष भंडारा जिल्ह्याकडे असल्याचे दिसून येते.

नरेंद्र भोंडेकर हे एकनाथ शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून भोंडेकर हे त्यांच्या अतिशय जवळचे समजले जातात. त्यामुळे आमदार साहेब सध्या 'आपला हाथ जगन्नाथ' या म्हणीप्रमाणे जिल्ह्यात मोठ-मोठी कामे खेचून आणत आहेत. परंतु भंडारा लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून सुनील मेंढे यांच्याकडून जनतेला ज्या अपेक्षा होत्या पूर्ण होताना दिसत नाहीत.

वास्तविक पाहता केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून, राज्यात भारतीय जनता पार्टी व शिंदे गट यांचे शासन आहे. एवढे असून सुध्दा भाजपचे खासदार मेंढे यांना कुठेही झुकते माप मिळाल्याचे जाणवत नाही. वास्तविक पाहता पाच वर्षांत भंडारा-गोंदिया क्षेत्राचा झपाट्याने विकास व्हायला हवा होता. परंतु खासदार साहेब आपल्या जिल्ह्याचे लाँबिग करण्यात यशस्वी झालेले दिसत नाही.

सद्यःस्थितीत विचार केला तर, खासदार निधीतून विकास कामे झाली नसल्याचे चित्र दिसते. तुलनात्मक दृष्ट्या विचार केला असता आमदार भोंडेकर यांनी विकास कामाचा सुरू केलेला झंझावात जोरात सुरू असून आमदार म्हणून त्यांनी केलेली कार्य जनतेसाठी फायद्याची ठरत आहे.

भाजपने (BJP) भंडारा (Bhandara) विधानसभा क्षेत्रात १९९०, १९९५, १९९९ व २०१४ या काळात प्रतिनिधित्व केले. तर २००९ व २०१९ या काळात शिवसेनेने (Shivsena) भंडारा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. आमदार भोंडेकर हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, म्हणून या पक्षात ‘भावी पालकमंत्री’ म्हणून यांच्याकडे पाहणे हा कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन योग्य असू शकतो. त्यांनी आपली इच्छा प्रकट करण्यामध्ये चुकीचे काहीच नाही. तसेही सद्यःस्थितीत आमदार भोंडेकर हे पालकमंत्री पदाचे निश्चितच दावेदार आहेत, असे जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांनी म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT