Bhandara, 05 September : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने मतदारसंघाऐवजी उमेदवारांची अदलाबदली केली होती. असाच अदलाबदलीचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ब्राह्मणकर यांनी चांगलाच घाम फोडला होता.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर ब्राह्मणकर यांची द्विधा मन:स्थिती झाली होती. ते नेमके कुठल्या पक्षाचे असा सवालही केला जात होता. मात्र, आता भाजपने किसान मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करून आता ते आमचेच झाले आहेत, यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी ते भंडारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नव्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने ज्याचा आमदार त्यांचा मतदारसंघ असा फॉर्म्युला तयार केला होता. आपसातील स्पर्धा आणि अडचण टाळण्यासाठी मतदारसंघाऐवजी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीने उमेदवारांची अदलाबदली केली होती.
भाजप-सेना युतीच्या कार्यकाळात मंत्री असलेले राजकुमार बडोले यांनी भाजप सोडून हातावर घड्याळ बांधले आहे. या बदल्यात भाजपने साकोली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून उमेदवार आयात केला. अविनाश ब्राह्मणकर हे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. अनेक बड्या नेत्यांना डावलून भाजपने थेट नाना पटोले यांच्या विरोधात उभे केले होते. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.
विशेष म्हणजे त्यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपने आमदार परिणय फुके यांना मैदानात उतरवले होते. नाना पटोले यांच्या विरोधात ब्राह्मणकर यांचा टिकाव लागणार नाही, असेच बोलले जात होते. मात्र, मतमोजणीत ब्राह्मणकर यांनी विजयाची नोंद करून सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र, त्यांचे दुर्दैवं आड आले. टपाल मतमोजणीत त्यांचा पराभव झाला. पटोले यांनी अवघ्या २०८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते.
निवडणूक आटोपल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांचा विषय संपला होता. ब्राह्मणकर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंभर रुपयांची पावती फाडून भाजपचे प्राथमिक सदस्यत्व पत्करले होते. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिघोरी मोठी जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषछ सदस्य म्हणून सभागृहात कार्यरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.