
संभाजीनगर :हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरवर राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करुन थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे भुजबळांचं नाराजीनाट्य सुरु असतानाच ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीत भुजबळांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना अध्यक्षपद देऊन भुजबळांचे पंख छाटल्याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा शड्डू ठोकला आहे. "मराठा आरक्षणाचे आंदोलन अद्याप संपलेले नाही. ते कोणी संपवू शकत नाही," असे त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत जरांगे यांनी राज्य सरकारने दिलेल्या शब्दानुसार महिनाभरात सातारा गॅझेट लागू करावे; अन्यथा येत्या निवडणुकांत सरकारचा धुरळा उडवू. राज्यभरात एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही," असा इशारा दिला आहे.
जरांगे पाटलांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी आणि सरकार अस्थिर करण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरु होता. मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी मुंबईत ठाण मांडले होते का? असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे, हा आरोप जरांगेंनी खोडून काढला आहे. जरांगे रुग्णालयातून बोलत होते.
जरांगे म्हणाले, "शिंदे यांच्या ऐकण्यावर आंदोलन करायचे असते तर आरक्षण नकोच म्हटलं असतं. आपल्याला राजकारण नको, आरक्षण पाहिजे, हे दोन वर्षांत सिद्ध केलं आहे. त्यामुळे राऊत कोणत्या उद्देशाने म्हणाले हे माहीत नाही."
पाच दिवस आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब विखे पाटील यांनी सांगितले. त्याबाबतचा जीआर त्यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. या जीआरबाबत ओबीसी संघटना, काही नेते संभ्रम निर्माण करीत असल्याचे दिसते. त्यावर जरांगे यांनी आपले आंदोलन अद्याप संपले नसल्याचे सांगितले आहे. जीआर प्रमाणे मागण्या मान्य झाल्या नाही तर रुग्णालयातील विश्रांतीनंतर आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संभ्रम निर्माण करणा-यांवर माझा आणि मराठा समाजाचा विश्वास नाही हे पुन्हा जरांगे यांनी म्हटलं आहे. आता आरक्षणाच्या जीआरबाबत बोलणाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. आरक्षणात सगळ्या मराठ्यांना घालणारच मी मराठ्यांचा नोकर आहे आणि समाजासाठी काम करतो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.