Dr. Prashant Padole, Sunil Mendhe and Sanjay Kumbhalkar Sarkarnama
विदर्भ

Bhandara-Gondia Lok Sabha Election : भंडारा-गोंदियात ट्विस्ट, बसपाने दिला तेली समाजाचा उमेदवार !

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024 : पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या उमेदवारांत लढत होईल, असे चित्र सुरुवातीला होते. काही प्रमाणात सध्याही आहे. पण येथे बसपाने तेली समाजाच्या भाजप नेत्याला उमेदवारी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. या मतदारसंघात तेली समाजाची मते लक्षणीय आहेत आणि हत्तीची चाल कोणत्या दिशेने राहते, यावर या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

2019 च्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सहज विजय मिळवला. आता बसपाच्या उमेदवारीने निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट आणला आहे. विशेष म्हणजे बसपाने तेली समाजातील उमेदवार उभा केल्याने चुरस अधिक वाढली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत लोकसभेच्या 20 निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये जातीय समीकरण आणि तिसऱ्या सक्षम उमेदवाराची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिली आहे.

भाजपने (BJP) विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा संधी दिली, तर काँग्रेसने नवा गडी, नवा डाव हे सूत्र लावत डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन समाज पार्टीने संजय कुंभलकर यांना, तर वंचित बहुजन आघाडीने संजय केवट यांना उमेदवारी देत निवडणुकीत नवीन ट्विस्ट आणला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा नवीन चेहऱ्यांना संधी देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघावर सर्वाधिक 11 वेळा काँग्रेसचे, तर 6 वेळा भाजपचे वर्चस्व राहिले आहे, तर राज्यातील बदललेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नवीन समीकरणामुळे या मतदारसंघात तब्बल 25 वर्षांनंतर भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे.

त्यामुळेच भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून डॉ. प्रशांत पडोळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधक ठरले. शक्तिप्रदर्शनाच्या पहिल्या टप्प्यात हे दोन्ही उमेदवार उत्तीर्ण झाले.

31 मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यात मतदारांच्या मनात घर करून त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्यात कोण यशस्वी ठरतो, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये (Congress) लढत होणार असली तरी बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर (Sanjay Kumbhalkar) यांच्या उमेदवारीनंतर या लढतीत चुरस वाढण्याची शक्यता आहे.

यात जातीय समीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली समाजाची सर्वाधिक मते आहेत. या तिन्ही समाजांच्या मतांच्या समीकरणावरच विजयाचे बरेच समीकरण अवलंबून आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT