Ajit Pawar, Praful Patel, Eknath shinde and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Bhandara-Gondia News : भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील दोन्ही अपक्ष आमदार आमच्यामुळे निवडून आले !

Praful Patel : 2019मध्ये आघाडी धर्म पाळला नसल्याची खुद्द प्रफुल पटेलांनीच दिली कबुली.

अभिजीत घोरमारे

Bhandara-Gondia News : काँग्रेससोबत असलेली आघाडी तोडून राष्ट्रवादीचा अजित पवार गट बाहेर पडल्यावर आघाडीतील नवनवीन राजकीय गुपिते बाहेर येऊ लागली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भंडारा आणि गोंदियातील दोन्ही अपक्ष आमदार आपल्यामुळेच निवडून आल्याचा दावा अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी आज (ता. 7) केला. त्यामुळे 2019मध्ये खासदार प्रफुल पटेलांनी आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे जाहीर सभेत कबूल केले आहे.

पटेलांच्या या विधानानंतर भंडारा - गोंदिया जिल्ह्यांत चर्चांना उधाण आले आहे. गोंदियाच्या सडक अर्जुनीत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दोन्ही जिल्ह्यांतील राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार-खासदार उपस्थित होते. महायुतीत भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गोंदियात पहिली जाहीर सभा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाषणादरम्यान खासदार प्रफुल पटेल यांनी नवनवी राजकीय गुपिते बाहेर काढली आहेत. 2019च्या निवडणुकीत गोंदिया विधानसभेची जागा काँग्रेसकडे तर भंडारा विधानसभेची जागा काँग्रेस राष्ट्रवादी समर्पित 'रिपाइं'ला गेली असताना या दोन्ही जागांच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकसंध असलेल्या राष्ट्रवादीने त्यावेळी अपक्ष उभे असलेल्या उमेदवाराला मदत केल्याचे पटेल यांनी सांगितले. त्यामुळेच भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आणि गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आपल्यामुळेच निवडून आल्याचे स्फोटक विधान त्यांनी केले आहे.

पटेल महायुतीचा धर्म पाळतील?

राष्ट्रवादी पक्षात फूट पडून अजित पवार गट महायुतीत भाजपसोबत सत्तेत सामील झाला आहे. अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुका आता भाजपसोबत मिळून लढणार, अशी घोषणा केली आहे. प्रफुल पटेल यांनी कितीही दावा केला तरी ही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला जाणार, हे निश्चित आहे. असे असताना येणाऱ्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीतील प्रफुल पटेल 'युती'चा धर्म पाळेल का? हा प्रश्न आता भाजपच्या नेत्यांना पडला आहे.

दोन दिवसांनी होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत भाजपचे नेते प्रकर्षाने हा मुद्दा रेटून धरणार असल्याचे भाजपच्या एका नेत्याकडून 'सरकारनामा'ला सांगण्यात आले आहे. त्यामुळे जाहीर सभेमध्ये प्रफुल पटेलांनी भावनेच्या भरात केलेल्या दाव्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये त्यातही भाजपमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT