Bhandara District Politics Sarkarnama
विदर्भ

Bhandara Politics News: प्रत्येक निवडणुकीत बदलताहेत राजकीय समीकरणे; आता उत्सुकता पालिका निवडणुकांची !

सरकारनामा ब्यूरो

The market committee elections had created a political mess : भंडारा जिल्ह्यातील पाच पैकी चार बाजार समित्यांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांसह नेत्यांचे रंगरूप वेगळेच पहायला मिळाले. राज्यात भाजप, शिवसेना युती तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची महाविकास आघाडी एकत्रित सक्रिय असतानाच बाजार समित्यांमध्ये मात्र सोयीचे राजकारण खेळले गेले. (However, politics of convenience was played in the market committees)

आता नगरपरिषदांच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात. शिवाय, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही पुढील वर्षी होणार आहेत. मात्र, या समित्यांतील समीकरणे त्यावेळी लागूच पडतीलच, असे नाही. भंडारा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकींमुळे राजकीय धुरळा उडाला होता. तुमसर बाजार समिती वगळता भंडारा, लाखनी, लाखांदूर व पवनी या चार बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. या चारही बाजार समित्यांच्या निवडणुका मध्ये भाजप - राष्ट्रवादी - शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध काँग्रेस - शिवसेना ( ठाकरे गट) अशा लढती झाल्या.

लाखांदूर व पवनीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस - शिवसेनेने (ठाकरे गट) तर लाखनी व भंडाऱ्यामध्ये माजी राज्यमंत्री परिणय फुके आणि भंडारा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप - राष्ट्रवादी - शिवसेनेने (शिंदे गट) सत्ता हस्तगत केली.

भंडारा येथे बाजार समितीवर सत्ता असलेल्या काँग्रेसच्या रामलाल चौधरी यांचा माजी राज्यमंत्री परिणय फुके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या गटाने सभापतिपदाच्या निवडणुकीत पुरती धुळधाण उडवली. चौधरींनी निवडून आणलेला सभापतिपदाचा उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुकेंनी रातोरात गळाला लावला आणि मागील विधानसभेत पटोलेंकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढत पुढील विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम खेळली.

राज्यात कोणाचीही युती, आघाडी असली तरीही स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगळीच असतात, हे पहायला मिळाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाविकास आघाडी कार्यरत असतानाही बाजार समितीत भाजपचे नेते डॉ. परिणय फुके यांनी राष्ट्रवादीचे सुनील फुंडे यांच्याशी युती करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरोधात लढा दिला. यात फुके- फुंडे गटाने पटोले यांच्या बरोबरीने सत्ता राखली.

आगामी काळात जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली व तुमसर नगरपरिषदेचीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीवरून फुके-फुंडे परिषदेत एकत्र येणार का? आणि विधानसभेसाठी एकमेकांना मदत करणार का, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. मात्र, पक्षीय आणि स्थानिक पातळीवर तशी समीकरण पुढेही राहतीलच, असे सध्यातरी म्हणता येणार नाही.

राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोघे मविआमध्ये असतानाही बाजार समित्यांत एकमेकांविरोधात उभे ठाकले. तीच परिस्थिती जिल्ह्यातील चार नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हे चित्र वेगळेही असू शकते. अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार असल्याची कबुली स्वतः नेतेच देत आहेत.

लाखनी बाजार समितीमध्ये (Dr. Parinay Fuke) डॉ. परिणय फुके, राष्ट्रवादीचे सुनील फुंडे यांच्या गटाने एकत्रित येऊन सत्ता मिळविली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचा गट होता. भंडारा समितीत सभापतिपदासाठी योग्य डाव साधत समझोता एक्सप्रेस करून काँग्रेसला पराभवाची धूळ चारली. सध्याचे चित्र असे असले तरीही तेच विधानसभेपर्यंत टिकवण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार, हे मात्र नक्की.

राजकारणात (Politics) प्रत्येक निवडणुकांचे (Elections) संदर्भ वेगवेगळे असतात. राजकीय लोकप्रतिनिधीही तेच सातत्याने स्पष्ट करत असतात. पालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुका लागण्यास अजूनही बराच अवधी आहे. या दरम्यान राजकारणात अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT