Bhandara District Politics : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले. या पॅनलचे 13 पैकी 9 संचालक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र तुरकर यांच्या नेतृत्वात संचालकपदाची निवडणूक लढविण्यात आली.
विशेष म्हणजे 5 गावांतील शेतकरी या संस्थेचे सभासद आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी चुल्हाडच्या 13 संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली. संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र तुरकर यांनी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व केले. तर भाजपचे डॉ. अशोक पटले यांनी बळीराजा शेतकरी पॅनलचे नेतृत्व केले. या सहकारी संस्थेला चुल्हाड, सुकळी नकुल, गोंडीटोला, पिपरी चुंनी,वारपिंडकेपार गावे संलग्नित करण्यात आली आहेत.
13 संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. तुरकर यांच्या शेतकरी पॅनलचे जितेंद्र चौधरी, चिंधू पारधी, संजय रहांगडाले, राधेश्याम तुरकर, संजय पटले, डॉ. जितेंद्र तुरकर, दिवाळू गुडेवार, प्रमिला अंबुले, अनु पटले विजयी तर डॉ. अशोक पटले गटाचे बोरकर, रामकोवर सोनवणे, देवेंद्र बानेवार, डॉ. अशोक पटले विजयी झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विजयी संचालकांची गावातून मिरवणूक काढत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. आता संस्थेचे अध्यक्षपद प्राप्त करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संचालकांना पळवापळवीचे प्रकार होण्याची शक्यता असली तरी डॉ. जितेंद्र तुरकर यांच्या गटाचे सर्वाधिक 9 संचालक निवडून आले असल्याने अध्यक्षपदासाठी त्यांचे पारडे जड आहे.
विजय प्राप्त झाला असला तरी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला अध्यक्षपदाची माळ पाडून घेण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी सहकारी सेवा संस्थांची भूमिका महत्त्वाची असते. किंबहुना या संस्थाच कर्ज वाटप करीत असतात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये या सेवा संस्थांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे लोक आपले पॅनल उभे करून या निवडणुकांत आवर्जून सहभाग घेत असतात.
आमदार-खासदारसुद्धा या निवडणुकांकडे लक्ष देताना पाहायला मिळतात. आता चुल्हाड सहकारी सेवा संस्थेवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विजय मिळवला असल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांना विशेष धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपल्या विधानसभा क्षेत्रात आमदार राजू कारेमोरे यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.