BRS - K Chandrashekhar Rao Sarkarnama
विदर्भ

BRS In Maharashtra Politics: राष्ट्रवादीमुळे 'बीआरएस'ची महाराष्ट्रातील वाटचाल मंदावली?

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News : महाराष्ट्रात दमदार आगमन करणाऱ्या तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची वाटचाल मंदावली असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे हा परिणाम असल्याचा राजकीय तर्क या घडामोंडीमागे लावला जात आहे.

बीआरएसने मराठवाड्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला. मराठवाड्यानंतर नागपूरसह विदर्भावर त्यांचा सर्वाधिक भर होता. भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव स्वतः नागपूरमध्ये येऊन गेले. त्यांनी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. पक्षाचे स्वतंत्र कार्यालय उघडण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका आपला पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आणि तुलनेने काँग्रेसमध्ये (Congress) मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.

बीआरएस भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. भाजपच्या (BJP) विरोधात वातवरण असल्याने मतविभाजनासाठी बीआरएसला मैदानात आणले जात असल्याचे दावेही काँग्रेसने केले होते. बीआरएसने आपला सर्व फोकस शेतकरी, दलित आणि ओबीसींवर केला होता. त्यामुळे बीआरएसचे उमेदवार काँग्रेसच्या मतांवर डल्ला मारतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल असा कयास वर्तविला जात होता. केसीआर यांनीसुद्धा नागपूरमधील आपल्या भाषणात कुठलाही पक्ष आणि नेत्यांवर टीकाटीपणी करण्याचे टाळत शेतकऱ्यांचे मुद्दे समोर केले होते.

केसीआर यांच्या तेलंगणा मॉडेलचे अनेकांना आकर्षण आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या जात असलेल्या योजना आणि अवघ्या आठ-नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी निर्माण केलेल्या सिंचनाच्या सुविधा सर्वाधिक लोकप्रिय आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी त्या किती फायदेशीर आहे हे बीआरएसतर्फे पटवून दिल्या जात होते. असे असताना अचानक वाटचाल हळू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बीआरएसच्या एका स्थानिक प्रतिनिधीस या संदर्भात विचारण केली असता त्यांनी महाराष्ट्रातील वाटचाल मंदावल्याचे वृत्त फेटाळून लावले. सध्या प्रदेश कार्यकारिणी तयार केली जात आहे. त्यात थोडा वेळ जात आहे. एकदा प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली जाणार आहे. या दरम्यान ग्रामीण भागात आमचे काम सुरूच असल्याचा दावा त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT