Sudhir Mungantiwar, Samarjit Ghatge and Harshvardhan patil Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar : "सोडून जाणारे परत..."; समरजीत घाटगे आणि हर्षवर्धन पाटलांसंदर्भात मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

Jagdish Patil

Nagpur News, 05 Sept : राज्यात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून विविध डाव आखले जात आहेत. समोरच्या पक्षातील नाराजांना हेरून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

याच नाराजीचा फटका भाजपला (BJP) मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच भाजपचे कोल्हापुरातील नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर भाजप नेते, हर्षवर्धन पाटील हे पक्षात नाराज असून ते देखील शरद पवाराच्या (Sharad Pawar) संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहेत.

मात्र, सोडून जाणारे विधानसभेच्या तिकीटसाठी सोडून जातील आणि सत्ता आल्यावर परत आमच्यासोबत येतील, असं मोठं वक्तव्य भाजप नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हा मोठा दावा केला आहे.

राज्यातील समरजीत घाटगे आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यासारखे आणखी काही भाजप नेते नाराज असून ते पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "सोडून जाणारे विधानसभेच्या तिकीटसाठी सोडून जातील आणि सत्ता आल्यावर परत आमच्यासोबत येतील. चिंता करू नका योग्य वेळी योग्य निर्णय करतील."

जयदीप आपटेला आपटावच लागेल

दरम्यान, यावेळी मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटेला (Jaydeep Apte) आपटला पाहिजे असं देखील म्हणाले. जयदीप आपटेने चूक केली असेल तर त्याला आपटावच लागेल. त्यांच्या चुकीचं महाराष्ट्राने नुकसान सहन का करायचे? त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्राण ओतून तयार केला नसेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांना भरपाई देणार

तर अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभं राहिल, जे काय नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र, काही लोक चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवतात. ज्यांना निवडणूक शास्त्र आणि खुर्ची शास्त्र माहिती आहे त्यांना अर्थशास्त्र कळत नाही. अशा लोकांपासून सावध रहा, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT