Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule-Sunil Kedar-PrafulGudadhe-Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : महाआघाडीच्या ‘स्ट्रॅटेजी’ने भाजप अलर्ट; ‘रामटेक’ होण्याची भीती

Nagpur South-West Constituency : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोकस असलेल्या फडणवीसांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीत गडकरींचे मताधिक्य घटले आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या मदतीने प्रफुल गुडधे यांनी या मतदारसंघातून कामही सुरू केले आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 27 August : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या विस्तारकांसोबत ऑनलाईन बैठका घेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात आज बैठका घेण्यात आल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोकस असलेल्या फडणवीसांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीत गडकरींचे मताधिक्य घटले आहे.

माजी मंत्री सुनील केदार यांच्या मदतीने प्रफुल गुडधे यांनी या मतदारसंघातून कामही सुरू केले आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ‘रामटेक’मध्ये जे झाले ते ‘दक्षिण-पश्चिम नागपूर’मध्ये होऊ नये, याची काळजी भाजपकडून घेतली जात आहे.

विधानसभेची निवडणुका जवळ येऊ लागल्याने भाजपनेही (BJP) जोरदार तयारी चालवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे पक्षाच्या विस्तारकांसोबत बैठका घेत आहेत. प्रत्येकाला विधानसभेच्या निवडणुकीची काय तयारी केली, याची विचारणा केली जात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis)मतदारसंघात आज तीन बैठका घेण्यात आल्या. त्या प्रत्येक बैठकीत चारशे ते पाचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खासकरून विदर्भावर संपूर्ण लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी अमरावतीचा दौरा आटोपला. त्या ठिकाणी त्यांनी दोनशे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. मंगळवारी ते आपल्या कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार होते. मात्र, तो दौरा रद्द करण्यात आला. त्याऐवजी नागपूर दक्षिण-पश्चिमच्या ऑनलाईन बैठका घेण्यात आल्या.

श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने घरोघरी उत्सव सुरू आहे. यानिमित्त जेवणावळीसुद्धा असतात. सणवारामध्ये होणारा खोळंबा टाळण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी ऑनलाईन बैठका घेतल्या. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्ध आपल्या मतदारसंघातील काही घरी भेटी दिल्या, त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला मोठा फटका बसला. दहापैकी दोनच जागा भाजपला राखता आल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर राखले. मात्र, पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पडले. विधानसभेत याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने पुन्हा बारकाईने कामाला सुरुवात केली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत यापूर्वी विदर्भातील सर्व मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत करावयाच्या कामांची यादी देण्यात आली. आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सर्व मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. राजकीय परिस्थिती जाणून घेत आहेत. राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असल्याने भाजपच्या वतीने दक्षता घेतली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनही गडकरी यांचे मताधिक्य घटले आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा फोकस हा फडणवीस यांच्यावर राहणार आहे. प्रफुल गुडधे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रफुल गुडधे यांनी आपल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. माजी मंत्री सुनील केदार हे त्यांच्या सोबत आहेत. रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत जे झाले, ते दक्षिण-पश्चिम मतदारसंघामध्ये होऊ नये, याची काळजी भाजपकडून घेतली जात आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT